लोकदर्शन 👉 विश्वास मोहिते
*सुंदर किल्ले स्पर्धेचा निकाल जाहीर, स्पर्धेत 100 हून अधिक स्पर्धकांचा सहभाग*
कराड :तिरंगा रक्षक वर्तमानपत्र आणि आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठान च्या वतीने घेण्यात आलेल्या *सुंदर किल्ला* स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर केला असून यामध्ये विजयी झालेल्या मुंढे तालुका कराड येथील *जय शिवराय मंडळाचा* गौरव नुकताच करण्यात आला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ,सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं सत्काराचे स्वरूप होते.
गत वर्षी दिवाळी मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेचा निकाल कोरोनाची महामारी आणि लॉक डाऊन च्या अडचणीमुळे 15 ऑगस्ट 2021 रोजी जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत जवळपास 100 ते 110 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये मुंढे तालुका कराड येथील जय शिवराय गणेश मंडळाने ही सहभाग घेतला होता. निवड समितीच्या निर्णयानंतर उत्कृष्ट किल्ला स्पर्धेत विजेता म्हणून जय शिवराय मंडळाला घोषित करण्यात आले. त्या निमित्ताने तिरंगा रक्षक च्या वतीने आणि आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठान, पाडळी (केसे ) च्या वतीने त्यांचा सत्कार मुंढे तालुका कराड या ठिकाणी करण्यात आला. यावेळी तिरंगा रक्षकचे संपादक आणि आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते,प्रतिष्ठानचे पदाधिकारी अनिल बडेकर, चंद्रकांत जाधव,अरुण जाधव, विनायक क्षीरसागर,प्रतिष्ठानचे कराड दक्षिण तालुका कार्याध्यक्ष जावेद मुजावर मुंढे गावचे ज्येष्ठ नागरिक आनंदराव साळवे, शिवाजीराव गावडे,निवास साळवे,तसेच ग्रामस्थ आणि युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आदर्शमाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते म्हणाले, आज स्पर्धेच्या युगात कलाकृती आणि बौद्धिक विकास वाढवण्याच्या दृष्टीने स्पर्धा घेणे काळाची गरज आहे,परंतु काही ठिकाणी या स्पर्धा घेण्यापासून स्थानिक मंडळे आणि शाळा दूर राहिलेल्या दिसून येतात, सामाजिक मंडळांनी तसेच महिला बचतगट,स्वयंसेवी संस्थांनी प्रबोधनात्मक आणि बौद्धिक विकास यांना मदत होईल अशा स्वरूपाचे उपक्रम राबविणे काळाची गरज आहे. स्वागत व प्रास्ताविक विनायक क्षीरसागर यांनी केले,तर आभार निवास साळवे यांनी मांडले.