लोकदर्शन👉
सुकुमार चेहऱ्यावर विस्कटलेल्या बटा
त्यामागे लपलेले अनाथ डोळे
अन् फाटका फ्रॉक सावरत
भर चौकात तुझी दखलही
न घेणाऱ्या प्रत्येकच गाडीचा
पाठलाग करत
या डांबरट रस्त्यांवरून अनवाणी
कुठे धावत सुटलीस बाई ?
तुला कळते का काही ?
विकासाच्या या जंक्शनमधून
एकही रस्ता भाकरीच्या गावी जात नाही.
पाऊणशे वयमान झालेल्या
भारतीय स्वातंत्र्यदिवसाच्या पूर्वसंध्येला
पोटासाठी तिरंगी फुगे विकणाऱ्या
हे कोवळ्या हृदयाच्या मुली !
कोणते आहे तुझे हक्काचे आभाळ ?
आणि कुठे आहेत त्यातील ते रंगबिरंगी
भविष्याचे स्वप्नफुगे ?
टागोरप्रणित स्वातंत्र्याच्या
त्या स्वर्गाकडे ? ‘ जेथे मन निर्भय अन्
माथा उन्नत असेल
जेथे ज्ञान मुक्त असेल
जेथे कठोर परिश्रमांचे बाहू
सफलतेकडे सरसावत असतील… ‘
गुरुदेव असेही म्हणाले होते की,
‘ जिथे कानावर येणारे शब्द
सत्याच्या गाभ्यातून बाहेर येतील
अन् स्पष्ट व तर्कसंगत विचारप्रवाहाचा मार्ग
मृत परंपरांच्या वाळवंटी वाळूत
हरवणार नाही ; आणि जेथील विश्व
संकुचित भिंतींनी तुकड्यांमध्ये
विभागले जाणार नाही… ‘
जेथे सतत प्रगल्भ होत जाणाऱ्या
विचार आणि कृतींकडे मनाचा
प्रवास असेल
अशा स्वातंत्र्याच्या स्वर्गात
माझ्या देशाला जाग येवू दे ….
पोरी, कुठे आहे तुझा देश ?
तुझ्या स्वातंत्र्याचा स्वर्ग ?
स्वप्नांचे रंगबिरंगी फुगे घेऊन
कुठे जायचे आहे तुला ?
अन् तुला मी शुभेच्छा तरी
कशा देऊ ?
-तीर्थराज कापगते