लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
*आ. मुनगंटीवार यांच्या कार्यकाळात वर्धा जिल्ह्याच्या विकासासाठी अभूतपूर्व निधी : खा. रामदास तडस*
*वर्धा जिल्हयातील भाजपाच्या लोकप्रतिनिधींची कार्यशाळा संपन्न*
*देवळी येथे विविध विकासकामांचे लोकार्पण*
१४ ऑगस्ट हा अखंड भारत दिन आहे, संकल्प दिवस आहे. भारतरत्न अटलजींनी अखंड भारताचा विचार घेवूनच लाहोर यात्रा केली. उद्या भारताच्या स्वातंत्र्याला ७४ वर्षे पूर्ण होत आहे. ‘मै प्रधानसेवक हूं’ असे देशाभिमानाने सांगणारे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या रूपाने आपल्याला लाभले आहे. २०४७ ला होणा-या स्वातंत्र्याचा शतकोत्सवाची तयारी भारतीय जनता पार्टीनेच पूर्ण करायची आहे. राज्यात भ्रष्ट व निष्क्रीय सरकार कार्यरत आहे. राज्याचे मंत्रालय अनाधिकृत बार झाला आहे, हे आपले दुर्देव आहे. जिथे मंत्रालयच सुरक्षीत नाही तिथे आमची आई बहीण कशी सुरक्षित राहील, असा सवाल विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केला.
दिनांक १४ ऑगस्ट रोजी चंद्रकौशल्य सभागृह देवळी येथे आयोजित वर्धा जिल्हयातील भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगर परिषद सदस्य, नगर पंचायत सदस्यांच्या तसेच अन्य लोकप्रतिनिधींच्या कार्यशाळेच्या उदघाटन समारंभात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी खा. रामदासजी तडस, माजी खासदार सुरेश वाघमारे, जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे, जिल्हा परिषद उपाध्यक्षा वैशाली येरावार, माजी मंत्री आ. अशोक उईके, आ. रामदासजी आंबटकर, आ. समीण कुणावार, आ. दादाराव केचे, आ. पंकज भोयर, जिल्हा परिषदेचे सभापती माधवराव चंदनखेडे, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, महासचिव मिलींद भेंडे, भाजपा शहर अध्यक्ष रवि कोरटकर, वर्धा नगर परिषदेचे अध्यक्ष अतुल तराळे, देवळी नगर परिषदेच्या अध्यक्षा सुचिता मडावी, गटनेत्या शोभाताई तडस, हिंगणघाटचे नगराध्यक्ष प्रेम बसंतांनी, पुलगावचे नगराध्यक्षा शितल गाथे, सिंधीच्या नगराध्यक्षा बबीता तुमाणे, आर्वीचे नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, देवळी न.प. चे उपाध्यक्ष नरेंद्र मदनकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, राज्यात समस्यांचा डोंगर उभा ठाकला आहे. शेतक-यांच्या हक्काचे पैसे त्यांना दिल्या जात नाही. २ लक्ष १९३ पदे रिक्त आहेत. ती भरली जात नाही. लोकायुक्तांची नियुक्ती करायला राज्य सरकारला वेळ नाही. दिव्यांगांचे, निराधारांचे अनुदान द्यायला सरकारजवळ पैसे नाही. राज्य सरकारचे विविध आघाडयांवरील अपयश जनतेपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी भाजपाच्या कार्यकर्त्यांची आहे. वर्धा जिल्हयात आष्टी व कारंजा वगळता सर्व नगर पंचायती व नगर परिषदा तसेच जिल्हा परिषद भाजपाच्या ताब्यात आहे. वर्धा जिल्ह्यातील नगर परिषदा , नगर पंचायतीसाठी तसेच एकूणच जिल्ह्याच्या विकासासाठी जो निधी आमच्या कार्यकाळात दिला गेला तेवढा पूर्वी कधीही दिला गेला नव्हता .पुढील वेळी जिल्हयात १०० टक्के यशासाठी प्रयत्न करण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
या कार्यक्रमापूर्वी बॅंक ऑफ बडोदा ते काळापूल देवळी पर्यंतच्या सिमेंट रस्त्यांचे लोकार्पण, भगवान बिरसा मुंडा सभागृह व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहाचे लोकार्पण तसेच मिनरनाथ मंदीर परिसराचा सौंदर्यीकरणाचे लोकार्पण आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी बोलताना खा. रामदास तडस म्हणाले, वर्धा जिल्हयाचे पालकमंत्री असताना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वर्धा जिल्हयाच्या विकासाला गती दिली. स्वातंत्र्यानंतर प्रथमच त्यांच्या पालकमंत्री पदाच्या काळात अभूतपूर्व असा निधी जिल्ह्यासाठी देण्यात आला.त्यांच्या प्रयत्नातुनच आज वर्धा जिल्हा चौफेर विकास अनुभवत आहे. त्यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा वर्धा जिल्हयातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा निर्विवादपणे फडकवू असा निर्धार त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
यावेळी आ. मुनगंटीवार यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. शिरीष बोढे, मिलींद भेंडे, आ. डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, आ. दादाराव केचे, आ. रामदास आंबटकर, आ. डॉ. अशोक उईके, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. सरिता गाखरे यांचीही भाषणे झालीत. कार्यक्रमाचे संचालन दीपक फुलकरी यांनी केले. कार्यक्रमाला भाजपाचे जिल्हा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.