चंद्रपूर सारख्या अगदी शेवटच्या टोकावरील जिल्ह्यातून राज्याच्या राजकारणात ज्या मोजक्या नेत्यांनी आपले जबरदस्त अस्तित्व निर्माण केले त्यात चंद्रपूर चे लोकनेते सुधीर मुनगंटीवार यांचा अग्रक्रम लागतो. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे राज्याचे नेतृत्व असे बोलले जायचे पण आता विदर्भ त्यांना मात देतो आहे आणि त्याच विदर्भातून राज्याचे राजकारण ढवळून काढणे ही साधी आणि सरळ गोष्ट नाही, मात्र सुधीरभाऊंनी आपल्या लढवय्या स्वभावाने आपली दखल घेण्यास भाग पाडले.
प्रचंड मेहनत करण्याची तयारी,अभ्यास करण्याची जिज्ञासा, झोकून देण्याची वृत्ती, धावून जाण्याची तळमळ आणि जनसंपर्क हे भाऊंच्या यशाचे गमक आहे,असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.
चंद्रपूर आणि बल्लारपूर हे भाऊंचे कार्यक्षेत्र. अर्थात ते लौकिकार्थाने. मात्र त्यांचे कार्यक्षेत्र क्षितिजापर्यंत आहे.कोणत्याही प्रश्नांवर अभ्यासपूर्ण आणि आक्रमक भूमिका घेण्याची हातोडी त्यांना गवसली आहे.
भाऊ,भाजपचे कार्यकर्ते, मग लोकप्रतिनिधी. कार्यकर्ता म्हणुन ते अहोरात्र कार्यमग्न असतात. पक्ष बांधणी असो की सामान्य माणसांचे प्रश्न असोत,दोन्ही त्यांच्यासाठी सारखेच. आमदार म्हणून ते तर अहोरात्र सेवारत राहतात, त्यामुळेच त्यांच्यावर प्रेम करणारा वर्ग पक्षातीत नाही,ते सर्वत्र आहे.भाजप तर आहेच पण कोणताही पक्ष आणि त्याची विचारधारा मानणारा माणूस भाऊंवर निस्सिम प्रेम करतो.
भाऊ प्रत्येक माणसाच्या पत्राची,त्याच्या फोनची व्यक्तिशः दखल घेतात, अर्थात कामाच्या व्यापात जर लगेच उत्तर देता आले नाही तर ते रात्री-बेरात्री त्यावर प्रतिक्रिया देतात.
भाऊ भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले,तेव्हाचा एक प्रसंग माझ्यासाठी सदैव आठवणीत राहणारा आहे.मी तेव्हा दैनिक युवाराष्ट्र दर्शन या दैनिकात जिल्हा प्रधिनिधी म्हणून कार्यरत होतो.भाऊंची प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती होताच त्यांचे मी एक लेख लिहिला.तो लेख त्यानंतर लोकशाही वार्ता या दैनिकात पुन्हा प्रकाशित झाला.हा लेख मलाही फार आवडला. जेव्हा एखादा लेख लेखकाला मनातुन भावतो,तो लेख साऱ्यांनाच आवडतो. भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांनी फोन करून माझ्या लेखची स्तुती केली.हा लेख भाऊंना वाचायला मिळाला नाही. कारण प्रदेशाध्यक्ष बनताच ते राज्यातील राजकारणात सक्रिय झाले.तीन दिवसांनी भाऊ चंद्रपुरात आले.रात्री उशिरा त्यांनी तो वाचला. रात्री 1 वाजता माझा फोन खणखणला. एवढ्या रात्री काहीतरी गडबड असेल म्हणून कुणाचा तरी फोन आला म्हणून मी तो उचलला. पुढून आवाज आला तो सुभाष कासनगोट्टूवार यांचा. त्यांनी सांगितले सुधीरभाऊंना तुमच्याशी बोलायचे आहे.मी गार झालो.उत्तररात्री एवढ्या व्यस्त माणसाने एका सामान्य पत्रकारशी बोलण्यासाठी फोन करावा याचे आश्चर्य तर होतेच पण कुतुहलही होते.भाऊ म्हणाले, अरविंदजी धन्यवाद म्हणून मी तुमच्या प्रेमाला उतराई होणार नाही,त्यामुळे हे प्रेम आणि तुमच्या लेखातील शब्द कायमस्वरूपी माझ्यासाठी मोलाचे आहेत.एवढ्या रात्री मी तुम्हाला त्रास दिला,त्याबद्दल क्षमस्व….
राज्याचे राजकारण ज्या व्यक्तीच्या भोवती फिरते त्या व्यक्तीने रात्री फोन करून आपली आठवण करणे माझ्यासाठी मोठा प्रसंग होता.भाऊंचे जनसंपर्क आणि ऋणानुबंध असे आहेत.प्रत्येक व्यक्तीला हा अनुभव सुखद धक्का देणारा असतो.
भाऊ,प्रदेशाध्यक्ष झाल्यावर भाजपचे संघटन पुन्हा सक्षम झाले.पक्षात दुफळी होणार नाही याची दक्षता त्यांनी घेतली.व्यक्तिगत ते सर्वच पक्षातील नेत्यांशी सौजन्याने वागतात,त्यामुळे त्यांच्या अध्यक्ष पदाचे कालावधीत भाजप बहरली. भाऊ राज्याचे मुख्यमंत्री होतील असे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना वाटू लागले पण भाऊ लक्षापर्यंत पोचताच त्यांचे प्रदेशाध्यक्ष पद गेले.त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष झाले.भाऊ नाराज झाले. पण पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी निर्णय स्वीकारला.
भाऊ राज्यात भाजपचे सरकार येताच मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जायचे पण त्यांना मुख्यमंत्री पदाने हुलकावणी दिली.अर्थमंत्री आणि वनमंत्री म्हणून उल्लेखनीय कार्य करते झाले.
चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून भाऊंच्या कामाचा धडाका बघता आला. भौतिक सुविधा निर्माण करण्यात भाऊंनी सर्वस्व पणाला लावले.मूल आणि पोंभुर्ण येथे आज झगमगाट दिसतो आहे,त्याचे श्रेय भाऊंना जाते.बल्लारपूर शहरातील बसस्थानक असो की चंद्रपुरातील अब्दुल कलाम बघिचा असो,अगडझरी चे बटरफ्लाय असो,सैनिकी शाळा असो की चंद्रपुरात निर्माणाधिन असलेले बसस्थानक असो,चिचपल्ली येथील बांबू संशोधन केंद्राचे जागतिक किर्तीची बांबूची इमारत असो की वनराजीक महाविद्यालयात झालेला बदल असो.हे सारे भाऊंच्या दूरदर्शी नेतृत्वाची झलक आहे.मात्र विसापूर जवळ तयार झालेले क्रीडांगणावर झालेला खर्च सध्यातरी वादातीत आहे.
असे व्यक्तिमत्त्व चंद्रपुरात असणे हीच भाग्याची बाब आहे.भाऊ राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत हीच आम्हा सर्वांची मनीषा आहे.तो दिवस नक्कीच येईल.
अहोरात्र समाजसेवा आणि राजकारण यात व्यस्त असणाऱ्या भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि भाऊ राज्याच्या राजकारणात असेच पुढे जावेत ही सदिच्छा…
अरविंद खोब्रागडे, चंद्रपूर
9850676782