चंद्रपूर :
जिद्द आणि परिश्रम असेल तर अशक्य काहीच नाही. मराठी मुलीने आपल्या खेड्यापासून तब्बल दीड हजार किलोमीटर अंतरावरील केरळमध्ये सहा वर्षे शिक्षण घेतले आणि बारावीच्या परीक्षेत 98 % गुण घेऊन महाराष्ट्राचा लौकिक वाढविला आहे. ही कमाल केली आहे आदिवासीबहुल कोरपना तालुक्यातील बोरी नवेगाव या खेड्यातील तुरीया शंकर तडस हिने.
केरळचे शिक्षण उत्तम असते आणि तेथे वसतिगृहाची व्यवस्था असल्यामुळे तुरीयाने सातवीपासून तिथे शिक्षण घेण्याचे आव्हान स्वीकारले. देशातील सर्वांत कठीण समजली जाणारी मलयाळम भाषा. ही भाषा अवगत करणे मोठेच आव्हान होते. मात्र पर्यायच नव्हता. संस्कृती, आहार आणि वातावरण अगदीच भिन्न असल्यामुळे सुरुवातीचे दिवस थोडे कठीण गेले. नंतर सहा वर्ष कसे गेले कळलेच नाही.
थ्रिसूर हे जिल्ह्याचे ठिकाण. येथे सारदा मठाच्या वतीने 100 मुलींचे वसतिगृह आणि शाळा चालविली जाते, अशी माहिती इंटरनेटवरून मिळाली. मात्र प्रवेश मिळेल की नाही हा प्रश्न होताच. चंद्रपूर येथील सुरेशजी पोनोली हे मूळ केरळचे असून त्यांच्या सहकार्याने शाळेत प्रवेश झाला होता. सारदा मठ हा संन्यासी महिला चालवितात. त्यामुळे साहजिकच एक पवित्र वातावरण या शाळेला लाभले आहे. कडक शिस्त येथील विशेष असून सर्व नियम कठोरपणे पाळावेच लागतात. त्यामुळे येथील मुली अभ्यासात नेहमीच पुढे असतात.