लोकदर्शन 👉 अविनाश पोईनकर
हल्ली ढोंगी साधू-संतानी आपापले दुकाने थाटलीत. कोणी स्वत:ला महासिद्धयोगी, शक्तीपाताचार्य समजू लागले. कोणी हवेतून सोन्याची चैन काढू लागले. तर कोणी पडद्याआड रम-रमा-रमीत रंगून आपला काळाकुट्ट चेहरा समाजापुढे टांगून दिशाभूल करुन गेले. अजूनही कित्येक महाशय स्वैर आकाशात शुभ्रपणा दाखवण्यात मग्न आहेत. यात चुक त्यांची मुळीच नाही. खरी चुक तर त्यांच्या नादाला लागणा-या आपल्यासारख्या स्वत:ला सुशिक्षित, पुरोगामी समजणा-या पण नितीमत्तेने गहाण असणा-या मुखवट्यांची आहे. आमच्या डोक्यात संत तुकारामाची बुद्धीप्रामाण्यवादी भुमिका ते संत गाडगेबाबांबाचा बुरसटलेल्या विचारांना स्वच्छ करणारा खराटा असता तर अशा दिवसांचा सुर्योदय कायमचा अस्तास गेला असता.
संताच्या कर्मभुमीने सुगंधित महाराष्ट्रात अजूनही ग्रामस्वच्छता अभियान राबवावे लागते, हे खरे तर आपल्या संस्काराचे फार मोठे अपयश आहे. ‘मले कोणी गुरु नाही, माझा कोणी चेला नाही’ असे ठामपणे सांगणारे गाडगेबाबा कधी मंदिरात गेले नाहीत, पण त्याकडे जाणारी पायवाट सतत स्वच्छ करत राहिले. ते कधी शाळेत गेले नाहीत, पण सर्वसामान्यांची लेकरं शिकून मोठी व्हावी, म्हणून अख्खी हयात खर्ची घातली. हा प्रबोधनाचा वारसा चळवळीतल्या नव्या कार्यकर्त्या पिढीने पुढे न्यावा, म्हणून या लोकविद्यापीठाचा जीवंत दस्ताऐवज यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष अरसोड यांनी समाजापुढे मांडला आहे.
मागील वर्षी विजय वेल्हेकर या शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्याचे ‘फकिरीचे वैभव’ हे चर्चीत आत्मचरित्र मनोविकासने उजेडात आणले. यंदा लेखक संतोष अरसोड यांचे ‘प्रबोधन पंढरीचा क्रांतिकारी संत गाडगेबाबा’ हे पुस्तक नामांकित मनोविकास प्रकाशनानेच नुकतेच प्रकाशित केले आहे. नव्हे तर खुद्द प्रकाशकांनी लेखकाकडून लिहून घेतले आहे. प्रबोधनकार ठाकरे यांनी संत गाडगेबांबावर विज्ञाननिष्ठ रोखठोक चरित्रलेखन केले. हाच समकालीन धागा पुढे रेटत अरसोड यांनी सदर पुस्तक प्रबोधनकारांना अर्पण करुन प्रबोधनाचे पाईक असल्याचा पुरावा सुरुवातीलाच दिला आहे. १९२ पानांचे गाडगेबाबावरील हे चरित्रलेखन धार्मीक पाखंडीपणा, अस्पृश्यता व अज्ञानाविरुद्ध विवेकशील आंदोलन उभे करत वाचकाला भानावर आणते.
लेखकांचा संत गाडगे महाराजांवरील व्यासंग अफाट आहे. लेखक संतोष अरसोड हे पत्रकार व कृतियुक्त कार्यकर्ता असल्याने त्यांना समाजाच्या प्रबोधनाची नस वाणीसोबत लेखनीला अचूक गवसली आहे. शक्यतो चरित्रलेखनात लेखक प्रभावात वाहून जातो. मुळात या चरित्रनायकाच्या प्रभावात वाहत जाण्याची नितांत गरज असतांना देखील समाजसापेक्षता हा गुणधर्म लेखकाने पाळला. यामुळे पुस्तकाची सामाजिक उंची अधिक विस्तारली आहे.
देशाला नव्हे तर विश्र्वाला दिशादर्शक ठरणारे दोन क्रांतीकारी आधुनिक महामानव विदर्भात झाले. एक म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तर दुसरे वैराग्यमुर्ती गाडगेबाबा. राष्ट्रसंताच्या नावाने नागपूर विद्यापीठ तर वैराग्यमुर्तीच्या नावावर अमरावती विद्यापीठ आहे. मात्र ही दोन्ही संत स्वतंत्र लोकविद्यापीठे होती. यांच्या कृतियुक्त विचारांचा दरवळ विद्यापिठातून बाहेर पडणा-या प्रत्येक फुलांतून बहरला असता तर डॉ.अब्दूल कलामांचं ‘व्हिजन २०२०’ स्वप्न कधीचेच पुर्ण झाले असते. सोशल मिडीयाच्या तुरुंगात तासनतास अडकलेल्या याच तरुणाईने हे पुस्तक वाचले तर तो या बेड्यातून मुक्त होवून धडपडण्याचा प्रयत्न करेल, इतकी ताकद गाडगेबाबा या चरित्रग्रंथात आहे.
संत गाडगेबाबा म्हणजे डेबूजी झिंगराजी जानोरकर. १९०५ ते १९५६ या ५१ वर्षाच्या कालखंडात लाखो मैलांचा प्रवास करत वेदनांच्या काट्यांचे कुरुप झाले, मात्र समाजाच्या वेदनामुक्तीसाठी बाबांनी किर्तनातून ग्रामसमृद्धी रुजवली. जातीय सलोखा टिकवला. शेतक-यांच्या मुक्तीचं आंदोलन उभारत विवेकाचा आवाज उजागर केला. माणसात देव शोधणा-या बाबांनी भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्यानागड्यांना वस्त्र, बेघरांना निवारा, रोग्यांना औषध, बेरोजगारांना रोजगार, मुक्या प्राण्यांना अभय, गरीबांना शिक्षण, निराशांना हिंमत मिळावी यासाठी केवळ प्रयत्न नव्हे तर कृती केली. गाडगेबाबांनी हुंडाप्रथेविरुद्ध बंड उभारत अनेक तरुण-तरुणींचे लग्न लावून दिले. स्त्रियांचा कायम सन्मान करत जगण्याचे अर्थसुत्र सांगणारे बाबा आजच्या काळात शोधूनही सापडणार नाहीत. अठ्ठावीस युगापासून पंढरीचा विठुराया कमरेवर घट्ट हात ठेवून तसाच उभा आहे. मात्र प्रबोधनाच्या पंढरीतील या विठोबाने एकाच युगात परिवर्तनाच्या लढाईत पायाला भिंगरी बांधून क्रांतीचा कळस रचला. त्यांच्या स्मृतींना उजाळा देत लेखकाने पुस्तकाला आधुनिक व कालसुसंगत विचारांची दिलेली जोड व केलेली मांडणी अतिशय प्रवाही आहे.
सदर पुस्तकात एकुण ३९ प्रकरणे आहेत. प्रत्येक प्रकरण मानवतावादाची भुमीका दृढ करत पुढे जाते. हे चरित्र केवळ गाडगेबाबा या एकट्या संताचे नसून संत कबीरापासून, महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख यांच्या विचारातून थेट प्रसवले असल्याने वैचारिक प्रगल्भतेचा परिचय देते. लेखक हे उत्तम वक्ते असल्याने लेखनाच्या भाषाशैलीत त्याचे प्रतिबिंब उमटले असल्याचे दिसते. बरेचदा प्रथितयश लेखक आपल्या लेखनशैली सभोवतीच घुटमळतात. संतोष अरसोड हे हाडाचे कार्यकर्ते आहेत. एक कार्यकर्ता जेव्हा समाजशील कृती करतो, तेव्हा ‘प्रबोधन पंढरीचा क्रांतीकारी संत गाडगेबाबा’ अशी अस्सल कलाकृती जन्मास येते.
लेखक या पुस्तकात निर्भीडपणे व्यवस्थेवर प्रहार करणारे सडेतोड प्रश्न विचारतांना कचरत नाहीत. गाडगेबाबांच्या वारसदार नातवांची जे.जे.धर्मशाळेत होणारी उपेक्षा त्यांनी थेट मांडली. ज्या प्रबोधन रथातून बाबांनी विज्ञाननिष्ठ दृष्टीकोण जनमानसात रुजवला तो प्रबोधनरथ समाधीस्थळावर खितपत पडलाय. ती प्रबोधनाची चाके शासनाने पुढाकार घेवून पुन्हा सुरु करावी, अशा अनेक कल्याणकारी सुचना देण्याचे धाडस परखडतेने केले आहे. ‘संत गाडगेबाबा केवळ व्यक्ती नाही तर तो एक विचार आहे. भयमुक्त समाज निर्माण करणारा हा विचार आहे. हा विचार तुमच्या मनातील धर्म, अध्यात्म, पोथी, पुराण, ग्रह, तारे, कुंडली यातून येणारे भय काढून टाकतो. हा विचार समाजाला नवी दिशा देतो. ही दिशा केवळ प्रकाशाची आहे. तथागत बुद्धापासून ते महात्मा फुले यांच्यापर्यंतचा एकत्रित वैचारिक प्रवास या विचारात आहे. समाजातील अत्यंत गंभीर प्रश्नांवर हा विचार आपणास चिंतन करायला लावतो. संत गाडगेबाबांनी केवळ विचार दिला नाही, तर व्यक्तिगत जीवनातही ते कृतीशील होते.’ गाडगेबाबांची समाज प्रबोधनाची कृतीशीलता माणूस म्हणून जगणा-यांनी स्विकारत मार्गक्रमन करावे, या आशावादाची पेरणी लेखकाने पद्धतशीर केली आहे.
लेखक प्रामाणिक आहे. त्यांची लिखाणाची व जगण्याची भुमीका ठाम आहे. या पुस्तकाच्या मनोगतात ते उघडपणे मांडतात, ‘मी लेखक नाही याची मला जाणीव आहे, कुणी लेखक समजूही नये. हे एका लहान कार्यकर्त्याने एका तेजस्वी अशा कार्यकर्त्यावर शब्दबद्ध केलेला प्रबोधन प्रवास आहे. या लिखाणातून एक कार्यकर्ता जरी तयार झाला, तर त्याचे समाधान लाखमोलाचे असेल.’ लोकविद्यापीठाचा हा जीवंत दस्ताऐवज घराघरात पोहोचून प्रबोधनाचा जागर होणे आजची व उद्याचीही गरज आहे. यासाठी लेखक, प्रकाशकासोबतच जाणत्या कार्यकर्त्यांचे हात निश्र्चितच पुढे सरसावतील, या विश्वासास दुमत नाही.
प्रबोधन पंढरीचा क्रांतिकारी संत गाडगेबाबा
लेखक – संतोष अरसोड
मनोविकास प्रकाशन, पुणे
मुखपृष्ठ – गिरीश सहस्रबुद्धे
पृष्ठ – १९२, मुल्य – २५०
– अविनाश पोईनकर
संपर्क – ७३८५८६६०५९
avinash.poinkar@gmail.com
•••