जपान मधील लोक जगातील इतर कोणत्याही देशातील लोकांपेक्षा दीर्घायुषी असतात. या लोकांच्या दीर्घायुष्याचं कारण आहे #इकिगाई.
ओकिनावा सारख्या शहरातील लोकांचे आयुर्मान खूपच जास्त आहे. तेथील दर एक लाख रहिवाशांपैकी 24.55 लोक हे 100 पेक्षा जास्त वयोगटातील आढळतात हे प्रमाण जागतिक वयोमानाच्या तुलनेत कितीतरी जास्त आहे.
तर काय आहे हे #इकिगाई , हा जादुई शब्द…ही एक जपानी संकल्पना आणि याचा ढोबळ अर्थ आहे ‘सतत व्यस्त राहण्यामध्ये असणारा आनंद.’
येथील लोकांच्या आनंदी जीवनशैली मागे,दीर्घायुष्या मागे जाणवलेले रहस्य आणि तुमचा #इकिगाई शोधण्यात तुम्हाला मदत करणारे हे पुस्तक…
काहीही केले तरी चालेल पण निवृत्त होऊ नका हा संदेश…जपान मध्ये निवृत्त होण्याची संकल्पनाच अस्तित्वात नाही…आपला इकिगाई आपल्यातच दडलेला असतो…तोच आपल्याला शोधायचा आहे.
★ या समाजातील लोक तणाव कमी होईल अशा प्रकारे आपल्या वेळेचे व्यवस्थापन करतात, त्याचप्रमाणे कमी मांसाहार करतात आणि प्रक्रिया केलेले पदार्थ कमी खातात,त्याचबरोबर मद्याचे प्राशन कमी करतात, तणावपूर्ण व्यायाम करीत नाहीत पण ते रोज ठरावीक हालचाली नक्कीच करतात आणि नियमित चालतात.
★हे लोक फक्त 80% च जेवतात, कधीही पोट भरून जेवत नाही त्यामुळे पचन करण्यासाठी लागणारी ऊर्जा वाचते आणि विनाकारण वाढणाऱ्या ऑक्सिडेशन प्रक्रियेलाही आळा बसतो.
★ मेंदूला व्यायाम देणे अत्यंत गरजेचे आहे,म्हणूनच नेहमी काहीतरी नवीन करणं, बदलाला सामोरं जाणं खूप महत्त्वाच आहे. यासाठीच जरी थोडसं अवघड वाटलं, तणाव जाणवला तरी आपल्या आरामसीमेतून बाहेर येणे आवश्यक आहे.उत्साही मन तुम्हाला नेहमीच चिरतरुण ठेवते.
★ तणावामध्ये शरीराची झीज इतर कोणत्याही कारणांपेक्षा जास्त होते. त्यामुळे आपण तणाव टाळण्यासाठी समस्या येण्यापूर्वीच उपाययोजना करायला हव्यात त्यासाठी कित्येक लोकांनी Mindfulness चा म्हणजेच जागरूक राहण्याचा सल्ला दिला आणि जागरुकतेच्या अवस्थेपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग म्हणजे ध्यान अर्थात मेडिटेशन. आणि जागरूकता ही प्रशिक्षणाने प्राप्त करण्याची गोष्ट आहे.
★ तुमच्या दिनचर्येचा जागरुकतेने अभ्यास करा आणि शरीराला हानिकारक असलेल्या सवयी ओळखून त्या सवयींचा ऐवजी चांगल्या सवयी लावा.
★ तुमची त्वचा ही आत मध्ये घडत असलेल्या बदलांचा परिणाम असते आणि ती शरीराच्या आत जे काही घडत आहे ते दाखवणारा आरसा असते.
★ संतुलित आहार घेणे,आहारात कॅल्शियमचा जास्त प्रमाणात अंतर्भाव करणं, दररोज आपल्या शरीराला योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घेणे. योग्य प्रमाणात झोप घेणे या गोष्टी फार आवश्यक आहेत. झोप हे चिरतरुण राहण्यासाठीचे प्रभावी साधन आहे. जेव्हा आपण झोपतो तेव्हा शरीरामध्ये मेलॅटोनीन आणि हार्मोन्स तयार होतात ज्यामुळे आपले शरीर चिरतरुण राहायला मदत होते.
★ मोरिता उपचार पद्धती- तुमच्या भावनांचा स्वीकार करा, तुम्ही जे करत आहात तेच करा, तुमच्या जीवनाचा उद्देश शोधा तसेच नाईकन ध्यान पद्धती यामध्ये सांगितले आहे की, जर तुम्ही रागात असाल आणि तुम्हाला भांडण्याची इच्छा झाली तर तीन दिवस थांबा आणि मग भांडायला सुरुवात करा तुमची भांडायची तीव्र इच्छा आपोआप नाहीशी होईल. जगामध्ये कितीतरी सदोष लोक आहेत,तरीही जगामध्ये विकासासाठी आणि ध्येयप्राप्तीसाठी खूप संधी आहेत.
★ कामाचा आणि मोकळ्या वेळेचा प्रगतीसाठी कसा वापर करा हे यात सांगितले आहे. आपण जे नेहमी करतो तसे आपण असतो,त्यामुळे उत्कृष्टता ही कृती नाही तर सवय आहे.
★ असं कोणतं काम आहे की जे करताना आपण सर्वात जास्त आनंदी असतो?आणि वेळ,काळ विसरून त्या कामामध्ये बुडून जातो?आपल्याला सगळ्या समस्यांचा विसर पडतो? या प्रश्नाचे उत्तर शोधणं म्हणजे आपला इकिगाई शोधण होय.
★ दर वेळेला तुमच्या कामांमध्ये असं काहीतरी जोडा ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आराम सीमा तोडायला मदत मिळेल.
★ एकाच वेळी एकापेक्षा जास्त काम केल्यामुळे कार्यक्षमता 60% ने आणि IQ 10 पॉईंट ने कमी होतो.
★ जी मुलं स्मार्टफोनच्या आहारी गेली आहेत ती कमी झोपतात त्यांचा मित्रपरिवार कमी असतो आणि अशा मुलांमध्ये निराशेचे प्रमाणही जास्त असतं.
★तंत्रज्ञानाचा गरजेपुरता वापर- आठवड्यातील एक दिवस तंत्रज्ञानाचा उपवास दिवस म्हणून साजरा करा झोपून उठल्यावर पहिला तासभर आणि झोपण्यापूर्वी एक तास कोणत्याही प्रकारची स्क्रीन पाहू नका.
★ जर तुम्हाला चिंता दूर करायची असेल तर सर्वात सोपा उपाय म्हणजे लोकांमध्ये मिसळा आणि त्यांच्याशी गप्पा मारा.
★ आपली खाद्यसंस्कृती खूप महत्त्वाचे आहे. आपण जे खात आहोत ते योग्य आहे का? हे ओळखण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे टेबलावरील अन्नाकडे बघून ते तपासायचं की आपण #इंद्रधनुषी_जेवण घेत आहोत का? याचा अर्थ आपल्या जेवणामध्ये सर्व रंगाच्या भाज्या किंवा सलाड किंवा टोफू कडधान्य यांसारख्या पदार्थांचा समावेश असायला हवा.
★ कमी कॅलरीज खाणं हे दीर्घकाळ जगण्यासाठी सर्वात आवश्यक बाब आहे जर प्रमाणापेक्षा जास्त कॅलरीज खाल्ल्या गेल्या तर आळस येतो आणि शरीराची सगळी ऊर्जा फक्त अन्नपचन यामध्ये खर्च होते.
★ तीस मिनिटे एका जागी बसल्यानंतर मेटाबोलिजम ची प्रक्रिया 90 % ने कमी होते, चरबी जळण्याची प्रक्रिया संथ व्हायला लागते आणि साधारण दोन तासानंतर चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण 20 %नी कमी होते, फक्त पाच मिनिटं आपल्या जागेवरून उठल्यामुळे आपण ही प्रक्रिया पुन्हा सुरू करू शकतो.
★ जर तुम्ही मनाला आणि शरीराला कार्यरत ठेवलंत तर तुम्ही नक्कीच दीर्घायुषी व्हाल. या जगामध्ये जर कायम आनंदी राहायचं असेल, तर तुमच्याकडे काहीतरी करण्याचे ध्येय पाहिजे, ज्यावर मनापासून प्रेम करावं असं काहीतरी तुमच्या आयुष्यात पाहिजे आणि जीवनामध्ये काहितरी मिळवण्याची आशा पाहिजे.
शेवटी, इकीगाईचे दहा नियम नेहमी लक्षात ठेवा-
१. कायम कार्यरत राहा आणि कधीही निवृत्त होऊ नका.
२. निवांत रहा
३.तुमचे पोट भरू नका (80% चा नियम)
४.चांगला मित्र परिवार
५.पुढच्या वाढदिवसाला जास्त तंदुरुस्त व्हा
६.हास्य
७.निसर्गाशी जोडलं जाणं
८.धन्यवाद द्या
९. वर्तमानामध्ये जगा आणि
१०.तुमच्या इकिगाई प्रमाणे वागा.