लोकदर्शन 👉 मोहन भारती
जिवती येथे सेवा कलश फाऊंडेशन आणि बाळु संस्थेच्या संयुक्त विद्यमाने २५ कुपोषित बालकांना सकष आहार भेट.
जिवती :– आमदार सुभाष धोटे यांच्या सामाजिक दायित्वातून सेवा कलश फाऊंडेशन राजुराचे संस्थापक अध्यक्ष अभिजित धोटे यांच्या पुढाकाराने आणि बाळु संस्थेच्या माध्यमातून अतिदुर्गम आणि आदिवासी बहुल जिवती तालुक्यातील २५ कुपोषित बालकांना प्रत्येकी एक या प्रमाणे बाळु साहित्य किट भेट देण्यात आली. या प्रत्येक किट मध्ये २ किलो मोट, २ किलो चना, २ किलो मुंग, २ किलो बरबटी, २ किलो वटाना, १ किलो नाचणी, १ किलो शेंगदाणे, १ किलो गुळ हे बाळु साहित्य भेट देण्यात आले.
या प्रसंगी उद्घाटकीय मार्गदर्शन करताना सेवा कलश फाऊंडेशनचे अध्यक्ष अभिजीत धोटे यांनी सांगितले की राजुरा विधानसभा क्षेत्रातून कुपोषणाच्या समस्येला हद्दपार करण्याचा आमदार सुभाष धोटे यांचा मानस असून कुपोषण मुक्तीसाठी सेवा कलश फाऊंडेशन कसोशीने प्रयत्न करणार आहे. या कामात बाळु संस्था आणि सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन परिसरातून ही समस्या पुर्णपणे हद्दपार करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत राहू.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सभापती अंजनाताई पवार या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जि प सदस्य भिमराव पाटील मडावी, माजी सभापती सुग्रीव गोतावडे, नगर पंचायत जिवतीचे उपाध्यक्ष अशफाक शेख, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष,सिताराम मडावी, उपसरपंच भिमराव पवार, विस्तार अधिकारी जगन्नाथ गारूळे यासह कुपोषित बालक, त्यांचे आईवडील, अंगणवाडी सेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रफुल्ल शेंडे यांनी केले. प्रास्ताविक बाळु संस्थेचे अध्यक्ष अमित महाजनवार यांनी तर आभार आयसीडीएस जिवतीचे गट समन्वयक अतुल गोरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दोन्ही संस्थेच्या सदस्यांनी अनमोल सहकार्य केले.