विदर्भाचे नंदनवन म्हणून प्रसिद्ध असलेले चिखलदरा आता देशपातळीसह जगभरात स्कायवॉकमुळे ओळखल्या जाणार आहे. सिडकोद्वारे अहोरात्र काम सुरू असल्याने येत्या 2021 वर्षाअखेरीस हा स्कायवॉक पर्यटकांकरिता उपलब्ध होणार आहे. चिखलदरा पर्यटन विकासाच्या आराखड्यात स्काय वॉकचा समावेश करण्यात आला आहे.
पर्यटकांच्या दृष्टीने हे एक विशेष आकर्षण असून चिखलदर्यातील गोराघाट पॉईंट ते हरीकेन पॉईंटपर्यंत स्काय वॉक 500 मीटरचा आहे. याचे जलद गतीने काम देखील सुरू आहे व दोन टॉवर दिमाखात उभे आहे. मध्यंतरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंद गतीने काम सुरू होते. सध्या मात्र वेग घेतला असल्याचे दिसून येते. अवजड यंत्रे, यंत्रसामुग्री, मोठमोठे लोखंडी खांब, काच हे सारे मेळघाटातील घाटरस्ते व विविध समस्याना तोंड देत बांधकामस्थळी आणणे आणि अकल्पित काम पूर्णत्वास नेणे एवढे सोपे नाही. त्यावर मात करीत काम करणार्या अॅपीपल कंपनीच्या कामगारांना दाद द्यावीच लागेल.
हा स्कायवॉक भारतातील पहिला असून आशिया खंडात दुसरा आणि जगातील तिसरा हा गगनभरारी पूल आहे. दोन मोठ्या टेकड्यांना स्कायवॉकने जोडण्यात येईल. हा स्काय वॉक पूर्णपणे काचेचा असल्याने पर्यटकांकरिता एक नवे आकर्षण निर्माण होईल. स्कायवॉकच्या माध्यमातून या भागात पर्यटकांची संख्याही वाढेल. मेळघाटातील चिखलदरा हा भाग सिडको द्वारे विकसित करण्यात येत आहे. त्यामुळे आता अमरावतीच्या चिखलदरा येथे जगभरातून पर्यटकांची गर्दी वाढेल, हे निश्चित.
स्वित्झर्लंडमधील 397 मीटरचा असून चायनाचा 360 मीटर लांबीचा आहे. भारतातील पहिला स्कायवॉक 500 मीटर लांबीचा व काचाचा असून तो चिखलदरा येथे निर्माण होत आहे. चिखलदरा येथे होत असलेला गगनभरारी झुला हा जगातील तिसरा असला जगातील सर्वांत मोठा आहे, कारण हा स्कायवॉक 500 मीटर लांबीचा राहणार आहे. 34 कोटी या स्काय वॉकचे बजेट असून 2021 वर्षाच्या अखेरीस पर्यटकांकरिता खुला होणार असल्याचे अभियंत्यांनी सांगितले.
***
सौजन्य : विदर्भ दर्शन फेसबुक पोस्ट