१) व्यसनाधीनता हा नकाराचा आजार असल्याने व्यसनी व्यक्ती आपण व्यसनी झाल्याचे सहजपणे मान्य करणे कठीण असते .
२) आपल्या व्यसनाधीनतेला किवा अध;पतनाला परिस्थिती , कुटुंबीय , मित्र , इतर लोक ,किंवा नशीब या गोष्टी कारणीभूत आहेत असे त्याला प्रामाणिकपणे वाटत राहते त्यामुळे तो स्वतःच्या अवस्थे बद्दल सतत इतरांना दोष देत राहतो .
३) बुध्यांक चांगला असला तरी भावनांक कमी असल्याने भावनिक संतुलन किवा व्यवहार चातुर्य या बाबतीत व्यसनी व्यक्ती कमकुवत ठरते..त्यामुळे अपयश मिळतच रहाते
४) आनंद , दुख: , राग , खुन्नस , लोभ , निराशा , अहंकार , लैगिकता , वैफल्य ,इ. सर्वसामान्य भावना व्यसनी व्यक्तीच्या बाबतीत अतिशय तीव्र स्वरूपाच्या किवा टोकाच्या असतात .
५) कमी श्रमात किवा झटपट यश मिळविण्याची वृत्ती असते , त्यामुळे सहजगत्या चुकीच्या मार्गाकडे वळतात , स्वतःचे विचार — भावना –वर्तन यांचे परखड परीक्षण करण्याची क्षमता नसल्याने असल्याने पुन्हा पुन्हा त्याच चुका करतात .
६) एक व्यसनी स्वतःसहित सुमारे चाळीस निकटवर्तीय लोकांचे भावनिक , आर्थिक , सामाजिक , किवा अध्यात्मिक नुकसान करीत असतो .
७) अगदी सुरवातीच्या काळात व्यसनाने दिलेला आनंद व्यसनीच्या मनात खोलवर रुजला असल्याने व्यसन बंद केल्यावर देखील त्याला व्यसनाची इच्छा होणे स्वाभाविक आहे .
८) मंत्र-तंत्र ,गंडे -दोरे , नवस -उपास , बुवा – विभूती , हे उपाय व्यसनी व्यक्तीला सहसा लागू पडत नाहीत कारण त्याने या बाबतची श्रद्धा गमावलेली असते , त्या मुळे त्याचे अंतर्मन अश्या गोष्टींना प्रतिसाद देणे कठीण असते .
९) व्यसनाधीनतेमुळे होणारे अध्यात्मिक / नैतिक अध:पतन हे व्यसनीचे झालेले सर्वात मोठे नुकसान असते .त्याच्यावर लहानपणी झालेले संस्कार , पालक — गुरुजन यांनी दिलेली जीवनमूल्य विषयक शिकवण तो पूर्णपणे झुगारून अनिर्बंधपणे जगत असतो आणि या गोष्टीचा त्याला योग्य पश्चाताप देखील होत नाही .
१०) फाजील आत्मविश्वासाने मी माझ्या इच्छाशक्तीच्या जोरावर व्यसन केव्हाही सोडू शकतो असे त्याला मनापासून वाटत राहते व काही काळ तो व्यसन बंद देखील करू शकतो परुंतु बंद केलेले व्यसन वारंवार पुन्हा सुरु होते ही खरी समस्या असते .
११) व्यसनाधीनतेची वाट व्यक्तीला मनोरुग्णालय, नशेच्या भरात हातून एखादा गंभीर गुन्हा घडल्याने तुरुंगवास , किंवा अकाली मृत्यूच्या दाढेत नेऊन सोडते .
१२) व्यसनात अडकलेले लोक बहुदा भावंडात सर्वात लहान , किंवा एकुलते एक , सर्वात मोठे , घरात लाडके , दोन तीन बहिणींच्या पाठीवर झालेले , मनमिळाऊ , हुषार , व गोड बोलणारे आढळतात .
१३ ) सहजगत्या खोटे बोलणे, खोट्या शपथा घेणे, आर्थिक व्यवहारात अप्रामाणिक असणे, अफरातफर करणे ,कृतज्ञता नसणे ,प्रचंड अहंकारामुळे मला कोणी काही शिकवण्याची गरज नाही, मी सगळ्यांना चांगला अोळखुन आहे असे वाटणे, स्वतः च्या इच्छेने सगळ्या गोष्टी व्हायला हव्यात हा अट्टाहास हे व्यसनीचे खास गुण असतात .
१४ ) इमोशनल ब्लॅकमेल करणे, मॅन्युपिलेट करणे , सतत तक्रारी करणे, इतरांच्या चुका शोधणे, दिशाभूल करणे, सहानुभूती मिळवणे, आत्मकेंद्रीत रहाणे , बढाया मारणे , पैश्यांची उधळपट्टी करणे , विलासी वृत्ती या गोष्टींमधे त्याचा हातखंडा असतो ..
१५ ) अशी गुणवैशिष्ट्ये असणाऱ्या व्यसनींना व्यक्तींना उपचार देतांना खुप सावध रहावे लागते 😊, सतर्क रहावे लागते, त्याची शरीरभाषा ओळखून त्याच्या बोलण्यातला गर्भितार्थ समजणे, त्याचा अहंकार न दुखावता त्याला सकारात्मक वाटेवर नेणे हे मोठे आव्हान असते