लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
⭕*शिष्टमंडळासह जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा*
चंद्रपूर:- ताडाळी येथील सिध्दबली इस्पात लिमी. मधील 87 अन्यायग्रस्त पूर्व कामगारांना अद्यापपावेतो अंतीम वेतन दिले नसल्याने तसेच त्यांना नोकरीत सामावून न घेतल्याने सिध्दबली व्यवस्थापनाकडुन होत असलेला हा अन्याय त्वरीत दूर करण्यासाठी तसेच नियमानुसार देय असलेले बोनस, अंतीम थकबाकी (एरीअर्स) ग्रॅजुइटी व अन्य राशी तसेच रोजगार अविलंब उपलब्ध करावा यासाठी जिल्हा प्रशासनाने कामगार हिताच्या या प्रश्नाची गाभीर्याने दखल घेवून सिध्दबली व्यवस्थापनास या अन्यायग्रस्त पूर्व कामगारांना न्याय देण्यासाठी बैठकीचे आयोजन करून योग्य निर्देश द्यावेत याबाबत पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दि 23 जुन रोजी जिल्हाधिकारी यांचेसोबत चर्चा केली.
या प्रसंगी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजु घरोटे, धानोरा पिपरी चे उपसरपंच विजय आगरे, ग्रा.पं. सदस्य विनोद खेवले, उत्तम आमडे, मुन्ना कुशवाह, रमेश सोनटक्के, अमोल झाडे, बागडे यांच्यासह अन्यायग्रस्त कामगारांचे शिष्टमंडळ उपस्थित होते. सन 2014 मध्ये सदर उद्योग बंद झाले होते त्यावेळी स्थायी/अस्थायी व तात्रिक असे सुमारे 180 कामगार, कर्मचारी कार्यरत होते. काही कालावधीनंतर सदर उद्योग पूर्ववत सुरू झाल्यानंतर ज्या कामगारांनी किमान 7 ते 8 वर्ष काम केले त्या जुन्या व अनुभवी कामगारांना उद्योगामध्ये पूर्ववत सामावून घेण्याची आवश्यकता होती परंतू कार्य करण्यास इच्छुक असलेल्या या कामगारांना डावलत परप्रांतीय कामगारांना प्राधान्याने नोकरीत सामावून घेण्याचे कृत्य व्यवस्थापनाकडुन घडले आहे. त्यामुळे संबंधीत अन्यायग्रस्त कामगरांमध्ये व्यवस्थापना विरूध्द आक्रोश आहे. अजुनही 87 कामगार न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर प्रश्नाची योग्य दखल घेवून कामगारांना न्याय देण्यासाठी व या प्रश्नी त्वरीत तोडगा काढण्यासाठी कामगार आयुक्त, सहायक कामगार आयुक्त, जिल्हा उद्योग केंद्र व पोलिस विभाग यांचेसह सिध्दबली व्यवस्थापनाची संयुक्त बैठक घेवून या कामगारांची आर्थिक देणी तसेच रोजगार विषयक प्रलंबित प्रश्न सोडविण्यात पूढाकार घ्यावा अशी सुचना हंसराज अहीर यांनी या चर्चेदरम्यान केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रश्नी तातडीने बैठकीचे आयोजन करून आवश्यक ती पावले उचलण्यात येतील असे आश्वासन पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांना दिले.