By : Arvind Khobragade
कॉविड 19 ची झळ संपुर्ण मानवजातीला बसली.मात्र असेही काही घटक आहेत की ते दुखते कुठे,हे सांगूंही शकत नाहीत. यात एक घटक आहे उच्च विद्याविभूषित आणि दुसरा आहे गरीब विद्यार्थी. दोघेही सिस्टीम चे बळी. पण यातही गोम म्हणजे गरीब विद्यार्थी ओरडु तरी शकतो मात्र उच्च विद्याविभूषित माणूस ओरडूही शकत नाही. तोंड दाबून बुक्यांचा मार खावा लागतो.देशभरातील बहुसंख्य महाविद्यालयात घड्याळी तासाप्रमाणे किंवा contributary हा गोंडस नावाने स्वतःला प्राध्यापक म्हणून घेणारा हा घटक कॉविड च्या महामारीत सर्वाधिक पिंजला गेला आहे.गेली दोन वर्षे त्याला ना तास भेटले ना वेतन.नियमित प्राध्यापकाने जी अहर्ता धारण केली असते तीच अहर्ता धारण केलेला हा माणूस दोनशे तीनशे रुपये तासाप्रमाणे राबतो. आणि नियमित प्राध्यापक दोन ते तीन हजार रुपये कमावतो.आज मात्र या दोनशे तीनशेचेही काम त्यांचे हातात नाही.त्यामुळे जगावे कसे हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे समाजात प्राध्यापक म्हणून प्रतिमा असल्याने तो कुठे कामालाही जाऊ शकत नाही. या विपरीत परिस्थितीत त्यांच्या जगण्याचे वांदे झाले आहेत. समाजात असे असंख्य वेठबिगारी प्राध्यापक असल्याने त्यांच्या आयुष्याची माती झाली आहे.
गरीब विद्यार्थी आता डिजिटल इंडियात शैक्षणिक नुकसान करून बसणार आहे. आता ऑनलाईन वर्ग होतील,मात्र या मुलांकडे ना मोबाईल ना संगणक. ते शिकत असलेल्या शाळाही त्यांना हे साहित्य पुरविण्याइतके सक्षम नाहीत. शिक्षक(अल्प)या विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतात पण तेही तुटपुंज्या.अशा वातावरणात ही मुले आता शैक्षणिक प्रवाहाच्या बाहेर फेकले जाण्याचीच भीती जास्त आहे.
आपल्या देशात भारत आणि इंडिया हे दोन देश वास्तव करतात.करोनात इंडिया ला जास्त फरक पडला नाही मात्र भारतातील वेठबिगारी प्राध्यापक आणि गरीब विध्यार्थ्यांवर याचा दूरगामी परिणाम होणार आहे.