लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
*देशभक्तांचे योगदान, आणिबाणीचा काळा इतिहास, योगाचे महत्व जनतेपर्यंत पोहचवणार – आ. सुधीर मुनगंटीवार*
राष्ट्रीय भारतीय जनता पार्टीने संपुर्ण देशभर २१ जुन रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन, २३ जुन डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा स्मृतीदिन, २५ जुन रोजी आणिबाणी विरोधी काळा दिवस आणि पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या ७८ व्या मन की बात या कार्यक्रमाचे सार्वजनिक प्रसारण हे चार महत्वाचे कार्यक्रम राबविण्याचे निर्देश दिले आहे. हे चार ही कार्यक्रम या देशाच्या अस्मितेशी, इतिहासाशी संबंधीत आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्हयात ग्रामीण भागात तसेच महानगरात हे कार्यक्रम यशस्वीपणे राबवावे असे आवाहन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दि. १६ जुन रोजी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्हा ग्रामीण व महानगर शाखेची ऑनलाईन बैठक संपन्न झाली. या बैठकीत आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. २१ जुन रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन आपण साजरा करतो. विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघात २१ जुन हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला. ५ हजार वर्षांची परंपरा योगाला आहे. श्रीमदभगवतगीते मध्ये भगवान श्रीकृष्णाने योगाचे महत्व विषद केले. संयुक्त राष्ट्र संघात १७५ देशांनी नरेंद्रभाईंच्या या प्रस्तावाला अनुमोदन दिले. पहिल्या वेळी १५० पेक्षा जास्त देशात योगदिन साजरा झाला.२१ जुन हा मोठा दिवस आहे. या दिवशी उत्तरायण संपुन दक्षिणायन सुरु होते.त्यामुळे योग दिनाला विशेष महत्व असल्याचे ते म्हणाले.
देश में दो विधान, दो निशान व दो प्रधान नही चलेंगे असा नारा देणारे प्रखर राष्ट्रभक्त डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा स्मृतीदिन २३ जुन रोजी आहे. काश्मिरसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या या सच्च्या देशभक्ताला पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी कलम ३७० रद्द करुन खरीखुरी आदरांजली वाहीली आहे असे सांगत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलीदानाचा समग्र इतिहास त्यांनी सांगीतला. ‘जहा हुये शहीद मुखर्जी, वह काश्मिर हमारा है’ असा नारा आम्ही द्यायचो. त्यांच्या स्मृतीला आदरांजली आपल्याला वाहयची असल्याचे ते म्हणाले.
२५ जुन रोजी इंदिरा गांधींनी देशात आणिबाणी लागु करत लोकशाहीची मुल्ये पायदळी तुडवली. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा अवमान केला. इंदिरा गांधीनी सत्तेचा, पदाचा दुरुपयोग केला. या देशाने पापाचा महासागर आणिबाणीत अनुभवला. न्याय व्यवस्थेने इंदिरा गांधींना फटकारले व पुढील लोकसभा निवडणुकीत त्यांचासह कॉंग्रेसला नाकारले. हा दिवस काळा दिवस म्हणून आपण पाळायचा असल्याचे आ. मुनगंटीवार म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधण्यासाठी मन की बात हा कार्यक्रम सुरु केला. आजवर ७७ कार्यक्रमांच्या माध्यमातुन त्यांनी भारतवासीयांशी संवाद साधला आहे. देशात अभिनव पध्दतीने होणारे वृक्षारोपण, किल्लेसफाई, आदिवासी विद्यार्थ्यांनी केलेली एव्हरेस्ट ची यशस्वी चढाई अशा विविध घटनांची नोंद पंतप्रधान घेतात. २७ जुन रोजी मन की बात चा ७८ वा कार्यक्रम आहे. या दिवशी मन की बात चे प्रसारण गावागावात, शहरात सार्वजनिक स्वरुपात साजरे करायचे, त्यात सर्व पक्षीय नागरिकांना, गोरगरीब जनतेला सहभागी करुन घ्यायचे असेही आ. मुनगंटीवार म्हणाले. भारतीय जनता पार्टी हा देशहित जपणारा पक्ष आहे. देशाचा इतिहास नव्या पिढीला ज्ञान व्हावा व त्या माध्यमातुन देशाच्या प्रगतीची प्रक्रिया पुढे जावी यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रमाची पराकाष्ठा करावी असेही आ. मुनगंटीवार म्हणाले.
भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी हे चारही कार्यक्रम कशा पध्दतीने आयोजित होतील व त्यासाठी कशी तयारी करण्यात आली आहे. याची विस्तृत माहीती दिली. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी कार्यक्रम उल्लेखनीय कसे ठरतील यादृष्टीने काही सुचना दिल्या. बैठकीला माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर , भाजपाचे प्रदेश संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, आ. किर्तीकुमार भांगडीया, जिल्हा परिषदच्या अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले, माजी आमदार सुदर्शन निमकर, अतुल देशकर, अॅड. संजय धोटे, जैनुद्दीन जव्हेरी, बल्लारपूरचे नगराध्यक्ष, हरिश शर्मा, भाजपाचे महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, संघटन महामंत्री राजेंद्र गांधी, भाजपा नेते प्रमोद कडू, महापौर सौ. राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, मनपा सदस्य सौ. अंजली घोटेकर, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा अल्का आत्राम, जिल्हा सरचिटणीस संजय गजपुरे, नामदेव डाहूले, भाजयुमो महानगर अध्यक्ष विशाल निंबाळकर, भाजयुमो ग्रामीण अध्यक्ष आशिष देवतळे, जिल्हा परिषद सदस्य ब्रिजभुषण पाझारे, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, राजेंद्र खांडेकर आदींची उपस्थिती होती.