वैद्यकीय शिबिरातून कोरोनामुक्तीकडे वाटचाल

By : Mohan Bharti

गडचांदुरच्या पूजाचा सामाजिक आदर्श

गडचांदूर : चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या गडचांदूर येथील पूजा संतोष टोंगे (वय २३) हिने समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. जन्मगाव असलेल्या टाकळी येथे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले होते. ८५ घरांच्या गावात जवळ – जवळपास ६० हून अधिक घरात कोरोना विषाणूचा प्रसार झाला. अचानक वाढलेले रुग्ण आणि त्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय सुविधांची निकड निर्माण झाली असताना पुजाने आवश्यक वैद्यकीय सामुग्रीसाठी लोकसहभागातून निधी उभा करत कोरोनाग्रस्त टाकळी गावात वैद्यकीय तपासणी व औषधोपचार देण्याचा निश्चय केला.

रीतसर प्रशासकीय परवानगी घेत १४ मे २०२१ रोजी आयुर्वेदिक डॉक्टर्सची टीम गावात पोहचली. सुरवातीला गावकऱ्यांत कोव्हिड १९ बद्दलची जनजागृती करण्यात आली. लोकांचा विश्वास संपादित केल्यानंतर १५ मे २०२१ रोजी ११० गावकऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यात ६० हून अधिक कोरोना होऊन गेलेल्या मात्र अनेक तक्रारींनी बेजार असणा-या रुग्णांचा सहभाग होता. सर्व रुग्णांवर आयुर्वेदिक पध्दतीने उपचार करण्यात आले. पुन्हा १७ मे व २४ मे २०२१ रोजी गावात वैद्यकीय तपासणी शिबिर घेण्यात आले. तेव्हा रुग्णांच्या तब्येतीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा दिसू लागली होती. या दरम्यान रुग्णांचे शास्त्रीय पद्धतीने माहिती संकलन करण्यात आले. नुकतेच गावात वैद्यकीय समारोपीय शिबिर पार पडले. आयुर्वेदिक उपचारांचा रुग्णांवर सकारात्मक परिणाम दिसल्याचे जाणवले.

“ग्रामीण भागात आयुर्वेदिक पध्दतीने कोरोनाग्रस्तांवर प्रभावीपणे उपचार केला जाऊ शकतो. कोव्हिड, कोव्हिड पश्चात् व नॉन कोव्हिड अशा एकूण जवळपास १५० रुग्णांची मोफत वैद्यकीय तपासणी व आयुर्वेदिक औषधोपचार करण्यात आली” अशी माहिती नागपूरचे डॉ. रचनील कमाविसदार यांनी दिली.या कामात पुण्यातील डॉ. प्रयाग सेठिया, डॉ. भाग्यश्री जिबकाटे, डॉ. राऊत, प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्थानिक डॉक्टर्स, आशा वर्कर्स भगत आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.

गावातील नागरिकांना दिलासा मिळाला असून नागरिकांच्या आरोग्यात सुधारणा दिसून आली आहे. या शिबिराचा सकारात्मक परिणाम दिसल्याने केलेल्या कामाचे समाधान वाटले. मी माझे सामाजिक कर्तव्य जाणून वैद्यकीय सेवेच्या कामात पुढाकार घेतला. माझे कुटुंबीय व आप्तस्नेहींचे विशेष सहकार्य लाभले म्हणूनच हे कार्य सिद्धीस जाऊ शकले असे मत पूजा टोंगे यांनी प्रतिपादित केले. यावेळी प्रतिष्ठित नागरिक सुरेश काकडे, संतोष टोंगे, दशरथ बोबडे, दिलीप भगत, अॅड. दीपक चटप, रुपेश ठाकरे, सरपंच ज्ञानेश्वर टोंगे, अरवींद तरवटकर, काशिनाथ झाडे,अनिल गुप्ता, महेश बंडेकर,प्राजक्ता बाेबडे, विक्रम झाडे,ग्रामसेवक शेख, सुनील वडस्कर, विक्रम रायसिडाम आदींची उपस्थिती होती. मोफत वैद्यकीय सेवा दिल्याने गावातील सरपंच ज्ञानेश्वर टोंगे यांनी डॉक्टर्स चमुचे आभार मानले.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *