By : Mohan Bharti
आमदार सुभाष धोटे यांच्या प्रामाणिक प्रयत्नाला यश
राजुरा:– राजुरा विधानसभा क्षेत्रतील ग्रामीण, आदिवासी बहुल, अतिदुर्गम भागातील होतकरू विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी येथे अत्याधुनिक सुविधायुक्त आणि सुसज्ज क्रीडांगणाची नितांत गरज होती. क्षेत्रातील क्रीडाप्रेमी विद्यार्थ्यांची अनेक वर्षापासून ही मागणी होती. आमदार सुभाष धोटे यांच्याकडे अनेकांनी ही मागणी लावून धरली होती. या अनुषंगाने आमदार सुभाष धोटे यांनी महाराष्ट्राचे क्रीडामंत्री सुनील केदार यांच्याकडे क्षेत्रातील राजुरा, कोरपना आणि गड्चांदूर येथील तालुका क्रीडा संकुलात अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यासाठी प्रत्येकी ८ कोटी रुपये निधीची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीची दखल घेऊन क्रीडामंत्री सुनील केदार यांनी राजुरा, कोरपना आणि गोंडपिपरी येथे तालुका क्रीडा संकुलात आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी प्रत्येकी ५ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.
महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेले राजुरा विधानसभा क्षेत्रातील युवक, युवती आपल्या अष्टपैलू प्रदर्शनासाठी सुपरिचित आहेत. तसेच ते प्रतिभासंपन्न आणि मेहनती आहेत. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ते पुढे आहेत. परंतु क्रीडा क्षेत्रात आनखी जास्त प्रगती करण्यासाठी संधी उपलब्ध होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांच्या कला गुणांना वाव देण्याकरिता अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारणे गरजेचे होते. त्याकरिता आमदार सुभाष धोटे यांनी क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्याकडे निधीची मागणी लावून धरली होती. मंजूर निधीतून सुसज्ज क्रीडा संकुल उभे राहण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून या परिसरातील विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धांची विशेष तयारी करून क्रीडा क्षेत्रात उंच भरारी घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
या प्रत्येक ठिकाणी क्रीडा संकुलामध्ये २०० मी. ट्रॅक, खो – खो, कबड्डी, व्हॉलीबॉल मैदान, बास्केटबॉल कोर्ट, पार्किग परीसर, पाण्याची सुविधा, प्रेक्षक गॅलरी, संरक्षण भिंत, चौकीदार केबिन, प्रवेशद्वार, चेंजिग रूम, प्रसाधन गृह, अंतर्गत रस्ते, विद्युतीकरण इत्यादी सुविधांचा ढोबळ मानाने समावेश करण्यात आलेला आहे.
या क्रीडा संकुलामुळे येत्या काळात या भागातून क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करणारे खेळाडू या मातीतून निर्माण व्हावेत. स्त्री – पुरुष अशा दोन्ही गटातून क्रीडा स्पर्धकांनी आपापल्या आवडीनुसार क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करुन क्षेत्राचे नाव राज्य तसेच देशपातळीवर कमवावे असे मत आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केले आहे.