संकलन 👉 लोकदर्शन
आई वडील गेल्याने मुलं पोरकी झालेली आहेत. त्यांची जबाबदारीb घेणार कोण? नातेवाईक सांभाळ करत असतील तर खूप चांगले पण तेही जवळ करत नसतील तर त्यांच्यासाठी शासन व सामाजिक संस्था यांनी पुढे येवुन एकत्रित काम करणे गरजेचे आहे.
कोविड १९ ची दुसरी लाट एवढी भयानक आली की, गाव गावात थैमान घातलेले आहे. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच गावांना या महामारीने विळखा घातलेला आहे त्यामुळे मृत्युचे प्रमाण शहरापेक्षा पेक्षा जास्त ग्रामीण भागात आहे. यामध्ये वृध्द मृत्यू पावले आहेतच तसेच तरुणांचे प्रमाण कमी नाही. बऱ्याच कुटुंबातील कर्ते व्यक्ती गेल्यामुळे कुटूंब पोरखे झालेले आहेत. काही कुटुंबात तर आई वडील दोन्ही गेलेले आहेत फक्त लहान मुलाचं आहेत आणि त्यांचे एका वेळचे खायचे वांदे आहेत. आई वडीलांना उपचारासाठी नातेवाईकांनी कर्ज काढून किंवा उसनवारी करून लाखो रुपये उपचारासाठी खर्च केलेले आहेत. खर्च होवून व्यक्ती वाचलेले नाहीत आणि कर्ज कसे फेडायचे या विचारात आहेत. त्यांचे मुलांचे शिक्षण, लग्न आणि उदरनिर्वाह असे प्रश्न निर्माण झालेले आहेत. आज नातेवाईक व मुलं मानसिक तणावाखाली आहेत. अशा कुटुंबांना समोर अंधार दिसत आहे. त्यांना आशेचा किरण दाखवणे एवढे सोपे नाही. या कुटुंबाचा सर्व्हे करून एक नियोजनबध्द कार्यक्रम तयार करून प्रशासन व सामाजिक संस्थांनी शाश्वत काम करावे लागणार आहे.
एक उदाहरण म्हणून एक घटना आपल्या समोर मांडत आहे. काही दिवसापूर्वी दवाखान्याच्या बीलामुळे रुग्णाने आत्महत्या केलेली आहे. तांदळ्याचीवाडी ता. जि. बीड येथील रामलिंग सानप हे दीप हॉस्पिटल बीड उपचार घेत होते. एक आठवड्यापुर्वी त्यांना ताप आला होता व श्वास घ्यायलाही त्रास होत होता म्हणून नातेवाईकांनी त्यांची बीड येथे कोरोना टेस्ट केली ते पाॅझीटीव्ह आले. HRCT 14 स्कोअर होता म्हणून त्यांना दीप हाॅस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. त्यामुळे त्यांना सुट्टी दिली जाणार होती. पण त्या अगोदरच शुक्रवारी पहाटे तिन वाजण्याच्या दरम्यान रुग्णालयातील जिन्याच्या गेटला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापुर्वी बायकोला फोन करून “माझे दवाखान्याचे बील 2 लाख झाले आहे ते आता कसे कसे भरायचे, कुठुन ईतका पैसा आणायचा,” असे चिंतायुक्त प्रश्न केले, तेव्हा रामलिंग यांची पत्नी त्यांना फोनवर म्हणाली, “कर्ज काढू, ऊसतोडीला जावून कर्ज फेडू, पण तुम्ही आगोदर दुरुस्त व्हा.” अशा तणावात अनेक कुटूंब सध्या ग्रामीण भागात आहेत. त्यांना आधार देणे खूप गरजेचे आहे.