By : Mohan Bharti
कोरपना – तालुक्यातील नांदाफाटा परिसरातील नांदा, बिबी, आवारपूर, हिरापूर, सांगोडा, अंतरगाव, कढोली, पिंपळगाव, नोकारी, पालगाव इत्यादी गावे मिळून ३५ हजार लोकसंख्या असून कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे ३० च्या वर लोकांचा आजपर्यंत मृत्यू झाला. काही लोक घरच्या घरी मृत्युमुखी पडले आहे. जवळपास आरटीपीसीआर केंद्र नसल्याने अनेक लोक तपासणी करीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संपूर्ण परिवार पॉसीटीव्ह येत आहे. त्यामुळे ३५ हजार लोकसंख्येच्या केंद्रस्थानी नांदाफाटा येथे आरटीपीसीआर केंद्र त्वरित स्थापन करण्याची मागणी स्मार्ट ग्राम बिबीचे उपसरपंच आशिष देरकर यांनी केली आहे.
गडचांदूर येथे एकमेव आरटीपीसीआर तपासणी केंद्र असल्याने याठिकाणी फार मोठी गर्दी असतात. एकट्या गडचांदूरात ४० हजार लोकसंख्या आहे. त्यातल्या त्यात अल्ट्राटेक, माणिकगड, अंबुजा, दालमिया या सिमेंट कंपन्यांतील अधिकारी व कामगार याच ठिकाणी तपासणी करतात. रोज केवळ १०० लोकांची आरटीपीसीआर चाचणी होत असल्याने व गर्दी असल्याने अनेक लोक पॉसीटीव्ह असताना देखील चाचणी करण्यास टाळाटाळ करीत आहे. त्याचा विपरीत परिणाम बाधीतांच्या परिवारावर होत असून त्यामुळे संपूर्ण परिवार पॉसीटीव्ह येत आहे.
आरोग्य विभागाच्या नियोजनाच्या अभावामुळे कोरपना तालुक्यात मोठ्याप्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. अनेक गावात तापाची साथ पसरली आहे. मात्र लोक चाचण्या करण्यासाठी घाबरत आहे. गडचांदूर येथे गर्दी असल्याने आरटीपीसीआर केंद्राच्या ठिकाणीच संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. नांदाफाटा येथे एक आरटीपीसीआर केंद्र स्थापन केल्यास चाचण्या वाढेल आणि संसर्ग सुद्धा कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे ३५ हजार लोकसंख्येच्या केंद्रस्थानी नांदाफाटा येथे आरटीपीसीआर केंद्र दिल्यास गडचांदूर केंद्रावरील ताण थोडाफार कमी होईल व लोकांच्या चाचण्यांमध्ये वाढ होईल त्यासाठी त्वरित नांदाफाटा येथे आरटीपीसीआर केंद्र स्थापन करण्यात यावे अशी मागणी ग्रामपंचायत बिबीचे उपसरपंच आशिष देरकर यांच्यासह नांदा ग्रामपंचायत सदस्य अभय मुनोत, नांदा येथील माजी सरपंच घागरु कोटनाके, निवृत्ती ढवस, नरेंद्र अल्ली, महेश राऊत, शामकांत पिंपळकर, हारून सिद्दिकी, अरविंद इंगोले, सतीश जमदाडे, अंतरगावच्या सरपंच सरिता पोडे, मुन्ना मासीरकर, कल्पतरू कन्नाके, नितेश शेंडे, गणेश लोंढे, सचिन मडावी, उदय काकडे, विजय कोल्हे, प्रमोद पिंपळशेंडे, दिनकर काकडे, नागेश बोंडे, आशिष बल्की आदींनी खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे केली आहे.