ज्ञानेश वाकुडकर
•••
• शिवाजी महाराजांनी कोवळ्या वयात जीवावर उदार होऊन, दऱ्याखोऱ्यात फिरून स्वराज्याची स्थापना केली.
• महात्मा गांधींनी स्वराज्याच्या लढाईचं नेतृत्व केलं. जेलमध्ये गेले. पण स्वातंत्र्याच्या उत्सवाकडे मात्र पाठ फिरवली. दंगलग्रस्त भागातील लोकांचे अश्रू पुसण्यासाठी निघून गेलेत. एक दिवस उशिरा सुद्धा जाता आलं असतं !
• बाबासाहेब ‘राज्यकर्ती जमात व्हा’ म्हणून शोषित समाजाला सदैव प्रेरणा देतात. स्वतः मात्र एका झटक्यात मंत्रिपदाचा राजीनामा फेकून मोकळे होतात..!
• नदीच्या पाण्यावरून संघर्ष नको, म्हणून बुद्ध सगळं वैभव, राजपाट सोडून निघून जातात..!
• सम्राट अशोक एवढं मोठं साम्राज्य असताना भगवान बुद्धाला शरण जातात..!
–
हे सारं जेव्हा जेव्हा आठवते, तेव्हा तेव्हा मला गम्मत वाटते. आपलं थेंब थेंब आयुष्य समजायला मदत होते. त्याचा किरकोळपणा जसा लक्षात येतो, त्याचवेळी त्याची अथांगता देखील मनाला दिपवून टाकते. प्रत्येकाच्या जगण्याचे टप्पे, कंगोरे वेगवेगळे भासत असेल तरी एकमेकात कसे गुंतलेले आहेत, परस्परांना कसे पूरक आहेत, याचं नवल वाटते..!
–
तसं पाहिलं तर..
पाणी वेगळं, उन वेगळं, वाफ वेगळी, वारा वेगळा, ढग वेगळे, गारवा वेगळा, थेंब वेगळे, सरी वेगळ्या, पाऊस वेगळा आणि गाराही वेगळ्या ! झाडाच्या पानावरून, घराच्या छतावरून, एखाद्याच्या अंगणातून आणि सार्वजनिक रस्त्यावरून बिनधास्त पळणाऱ्या धाराही वेगळ्याच !
पण.. खरंच हे सारं वेगळं वेगळं आहे का ?
–
..आणि विशेष म्हणजे हवामानाचा अंदाज सांगणाऱ्या आमच्या वेधशाळा देखील पूर्णतः वेगळ्या !
–
वेधशाळा म्हणजे पाऊस नव्हे. आपल्या वैचारिक चळवळी ह्या वेधशाळेेसारख्या असतात. कधी अंदाज चुकतो, कधी बरोबर येतो. पण आपल्याला पावसापेक्षा आपल्या अंदाजाचाच अभिमान जास्त वाटायला लागतो ! आम्ही त्यातच गुंतून पडतो ! हल्लीचा काळ हा असा आहे !
–
भगवान बुद्ध, सम्राट अशोक, शिवाजी महाराज, महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर.. हे पाऊस ! त्यांचा त्यांचा काळ वेगळा, त्यातून आलेली पिकं वेगळी, त्या त्या पावसाच्या टप्प्यात येणाऱ्या नद्या देखील वेगळ्या ! ज्याच्या गावावरून जी नदी गेली असेल, ज्या नदीच्या पाण्यावर एखाद्याची शेती बहरली असेल, बागा फुलक्या असतील, विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली असेल, त्याला त्या नदीचा विशेष अभिमान वाटणं, हे स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. आपली आपली दृष्टी असते, आपला आपला अनुभव असतो, आपला आपला आवाका असतो !
–
थेंब थेंब जुळत जातो
तेव्हा होते नदी
पुढचा प्रवास कळत जातो
तेव्हा होते नदी !
शून्यालाही अनंताची
जेव्हा नशा येते
तेव्हा साध्या थेंबाची ही
महानदी होते !
–
आपण वेधशाळेतच गुंतून पडायचं की स्वतः पाऊस व्हायचं, नदी व्हायचं, समुद्र व्हायचं.. की जुन्या पाण्याच्या साठ्यावरच आपली शेती करत राहायची, त्याच्या वाटणी साठीच भांडत राहायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे !