By : Shivaji Selokar
*100 बेडेड महिला रूग्णालय सुध्दा तातडीने कोविड रूग्णांसाठी उपलब्ध करण्याची मागणी*
चंद्रपूर जिल्हयात कोरोना रूग्णांची झपाटयाने वाढणारी संख्या तसेच वाढणारा मृत्युदर लक्षात घेता वेस्टर्न कोलफिल्डस़ लिमी. चे चंद्रपूर शहरातील लालपेठ परिसरातील हॉस्पीटल व घुग्घुस येथील राजीव रतन हॉस्पीटल जिल्हा प्रशासनाने कोविड रूग्णांसाठी अधिग्रहीत करावे तसेच 100 बेडेड महिला रूग्णालय सुध्दा तातडीने कोविड रूग्णांसाठी उपलब्ध करावे, अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने आणि वेकोलिचे सिएमडी मनोजकुमार यांच्याशी आ. मुनगंटीवार यांची चर्चा झाली असुन त्यांनी सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे.
चंद्रपूर जिल्हयात कोविड रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, मृत्युदर सुध्दा जास्त आहे, कोरोना प्रतिबंधक उपचारासाठी आरोग्य यंत्रणा मात्र कमी पडत असुन बेडसची संख्या अपुरी पडत आहे. औषधांचा तुटवडा मोठया प्रमाणावर भासत आहे, रेमीडीसीवीर हे इंजेक्शन रूग्णांना मिळत नसल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. बेडस उपलब्ध नसल्यामुळे परिस्थिती आटोक्याबाहेर जातांना दिसत आहे. खाजगी रूग्णांलयामध्ये सुध्दा बेडस् उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रूग्ण व त्यांचे नातेवाईक चिंताग्रस्त झाले आहे. तज्ञ वैदयकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांची रिक्त पदे ही चिंतेची बाब आहे. ऑक्सीजन बेडस्, व्हेंटीलेटर बेडस् सुध्दा उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीवर तोडगा काढण्याच्या द़ष्टीने वेकोलिचे चंद्रपूर शहरातील लालपेठ परिसरातील हॉस्पीटल व घुग्घुस येथील राजीव रतन हॉस्पीटल जिल्हा प्रशासनाने कोविड रूग्णांसाठी अधिग्रहीत करत उपलब्ध केल्यास यासंदर्भात मोठी उपाययोजना ठरेल असे आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
त्याचप्रमाणे शासकीय वैदयकीय महाविदयालय व रूग्णालय येथील 100 बेडेड महिला रूग्णालयाचे नुकतेच उद्घाटन होवूनही सदर रूग्णालय कोविड रूग्णांसाठी उपलब्ध झालेले नाही. वर्षभरापुर्वी कोरोना संक्रमण सुरू झाल्यापासुन मी या विषयाचा पाठपुरावा करित आहे. ही बाब सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांच्या आपण निदर्शनास आणुन दिली आहे. सदर विषयाकडे होणारे दुर्लक्ष चिंताजनक आहे. हे महिला रूग्णालय सुध्दा तातडीने कोविड रूग्णांसाठी उपलब्ध करण्याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.