वाकीसह इतर गावांचे सर्वच स्तरांतून कौतुक !
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील जिल्हा रायगड,तालुका महाड येथील चहू दिशांनी वसलेल्या वाकी गावठाण ग्रामस्थ मंडळाने व इतर गावाने पालखी उत्सव साध्या पद्धतीने साजरा करत सर्वांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.
कोंकण म्हंटलं की कोकणातील सण हे नेहमी चर्चेचा विषय ठरतात.कोकणातील गणेशोत्सव हा जसा लक्षणीय असतो तसेच कोकणातील शिमगा अर्थात होळी महोत्सव सुद्धा सर्वांना लक्ष वेधायला भाग पाडतो . परंपरेनुसार होळीच्या दिवशी रात्री बाराच्या ठोक्याला गावच्या वेशी जवळ येऊन गावचे जेष्ठ होळीगीत गातात व लाकडा पेंड्याची होळी पेटवली जाते .त्यानंतर धुलीवंदनाच्या दिवशी सकाळी पुन्हा जिथे होळी पेटवली तिकडे एकत्र येऊन त्या राखेने सर्वांच्या कपाळी टिका लावून तिलक होळी पार पाडली जाते त्यानंतर त्याच दिवशी दुपारी सर्व ग्रामस्थ मंडळी एकत्र येऊन ग्रामदेवतेची शिवाजी नगर येथे सानेवर पालखी बांधतात व बारा गावातील सर्व मान्यवर चर्चा करून योग्य ते व्यवस्थापन करतात.चर्चा सत्र पार पडले की नियोजनानुसार सोमजाई देवी मंदिरात ती पालखी नेली जाते व मंदिरात आरती करून त्याच दिवशी पालखी पुढे शेवते या गावातील मानकऱ्याच्या घरी बाजा वाजवत नेली जाते परंतु यंदा शांतपणे पालखी नेण्यात आली. पुढे वाकी येथील गावठाण मानकऱ्याच्या घरी पालखी रात्रभर वस्तीसाठी येते . दुसऱ्या दिवशी सकाळी ग्रामदेवता सोमजाई देवीची पालखी प्रत्येक खेलींच्या घरी म्हणजे प्रत्येक कुटुंबांच्या घरी नेली जाते .परंतु कोरोनाचे सावट असल्याने पालखी मानकऱ्याच्या घरी ठेवली असून प्रत्येक घरातील काही नवस वगैरे असतील तर ते नमसले गेले , नमस्करी गाराने गातात आणि नंतर लोक नवस फेडतात . नवसाप्रमाणे काहींच्या घरी नैवेद्य असते अर्थात गाव तशी परंपरा म्हणजे काही ठिकाणी तिखट गोडाचा सुद्धा नैवेद्य हा असतो. या जागृत सोमजाई देवीच्या पालखी सोहळ्याला अनेक तालुक्यांतून लोकं ही आवर्जून येत असतात. त्याचबरोबर माहेरवासींनी देवीची ओठी भरण्यासाठी येतात. यंदाच्या वाकी गावठानातील पालखीचे वैशिष्ट्य असे की पारंपरिक पद्धतीने साजरा होणाऱ्या पालखी सोहळ्याचे नियोजन हे सरकारी नियमांचे पालन करून करण्यात आले. दर्शनासाठी येताना मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्स या त्री- सूत्रांचा वापर करण्यात आला.
ही पालखी सर्वात प्रथम वस्तीला वाकी गावठाण येथे थांबते त्यानंतर नानेमाची, शेवते,आंब्याचा माळ,खरकवाडी,शेंदूरमळई,नारायण वाडी , पेडामकर वाडी,नांद्रुकाची वाडी,शिवाजी नगर अश्या एकूण बारा गावात पालखी थाटामाटात फिरवून अखेर शिवाजी नगर(सानेवर) येथे विसर्जित केले जाते.हे सर्व व्यवस्थित पध्दतीने पार पडत असल्याने वाकी गावासह इतर जोडलेल्या गावांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
©शुभम शंकर पेडामकर