👉शिवाजी सेलोकर
*आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केल्या विविध मागण्या*
*सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणांचा घेतला आढावा*
*चंद्रपूर जिल्हा लसीकरणामध्ये अव्वल ठरावा – ना. राजेश टोपे*
चंद्रपूर जिल्हयातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या तसेच वाढते मृत्यु लक्षात घेता प्रशासनाने या आपत्तीचा दक्षपणे सामना करायचा असेल तर जिल्हाधिकारी, मेडीकल कॉलेजचे अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकीत्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी या चार अधिका-यांमध्ये असलेला समन्वयाचा अभाव तातडीने दूर व्हावा, जिल्हयातील चाचण्यांची संख्या वाढवावी व या एकूणच प्रक्रियेत निर्णय घेण्याच्या व निर्णयांच्या अंमलबजावणीची गती वाढवावी, अशा सुचना विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केल्या. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या मौलीक सुचनांच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करावी व जिल्हयातील टेस्टींगची संख्या वाढवत कॉन्टॅक्ट ट्रेसींगवर भर द्यावा, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी जिल्हाधिका-यांना दिले.
चंद्रपूर जिल्हयातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विनंतीनुसार सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी २७ मार्च रोजी ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीला आ. सुधीर मुनगंटीवार, आ. सुभाष धोटे, आ. किशोर जोरगेवार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले, महापौर सौ. राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अधिष्ठाता डॉ. हूमणे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. राठोड, जिल्हा आरोग्य अधिक्षक डॉ. गहलोत, मनपा आयुक्त राजेश मोहीते आदींची उपस्थिती होती.
या बैठकीत बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता टेस्टींग संख्या वाढविण्याची मागणी केली. मोठया प्रमाणावर वैद्यकिय अधिकारी, तज्ञ, नर्सेस यांची पदे रिक्त आहेत. फिजिशियन नोकरी सोडून जात आहेत. या बाबींचा गांभीर्याने विचार होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे रिक्त पदे भरण्याच्या दृष्टीने कालबध्द कार्यक्रम आखावा अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली. या कोरोना काळात मे २०२० पासून फेब्रुवारी २०२१ पर्यंत देयके प्रलंबित आहेत. या संदर्भातील फाईल्स प्रलंबित आहेत, अशी परिस्थीती राहिली तर प्रशासनाला कोण मदत करेल असा सवालही त्यांनी यावेळी बोलताना केला. कोरोनाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी बेड मॉनिटरींग सिस्टीम उत्तम करावी, कॉल सेंटर तयार करण्याची घोषणा झाली मात्र अंमलबजावणी झालेली नाही त्यामुळे कॉल सेंटर त्वरीत करण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादीत केली. प्रत्येक गावात ऑक्सीमीटर, थर्मामीटर द्यावे तसेच स्वच्छतेसाठी ग्राम पंचायतींना निधी द्यावा, ३६ रूग्णवाहीका उपलब्ध करण्यात आल्या मात्र डिझेल, ड्रायव्हर यासाठी निधी देण्यात आलेला नाही याकडे सुध्दा त्यांनी लक्ष वेधले. मेडीकल वेस्ट डिस्पोजलची समस्या सुध्दा महत्वाची आहे. या समस्येचे सुध्दा प्राधान्याने निराकरण करण्यात यावे. रूग्ण उपचारासाठी रूग्णालयात आल्यानंतर त्यांना उत्तम उपचार व चांगली वागणूक मिळावी तसेच त्यांना कोणत्याही प्रकारची भिती वाटू नये या दृष्टीने जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे आ. मुनगंटीवार म्हणाले.
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातुन २५ टक्के निधी आरोग्यावर खर्च करण्याचे ठरले असताना तो खर्च केला जात नाही. याकडे सुध्दा त्यांनी आरोग्य मंत्र्यांचे लक्ष वेधले. कोरोना काळात तातडीने निर्णय व्हावे यादृष्टीने दहा दिवसात फाईल क्लीअर कराव्या या मागण्या सुध्दा त्यांनी यावेळी केल्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय चंद्रपूर येथील कंत्राटी कामगारांचे वेतन ८ महिन्यांपासून थकित असल्याच्या प्रश्नाकडे त्यांनी यावेळी लक्ष वेधले. एकीकडे कोरोना योध्दयांचा आपण सन्मान करतो मात्र कोरोना काळात सेवा देणा-या कंत्राटी कामगारांना वेतनापासून वंचित ठेवतो हे संयुक्तीक नसल्याचे आ. मुनगंटीवार म्हणाले.
चंद्रपूर जिल्हयात कोरानाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ऑस्कीजन बेड्स जास्तीत जास्त संख्येने निर्माण करावे, खाजगी डॉक्टरांच्या सेवा घ्याव्या , रूग्णांना पोस्टीक जेवण द्यावे, आरोग्य सेवेचा दर्जा सुधारावा, कॉन्टेक्ट ट्रेसींग वाढवावे असे विविध निर्देश आरोग्यमंत्र्यांनी जिल्हाधिका-यांना दिले. लसीकरणाच्या प्रक्रियेत सर्व लोकप्रतिनिधींनी योगदान देत लसीकरणात चंद्रपूर जिल्हा अव्वल ठरावा अशी अपेक्षा सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.