By : Shankar Tadas
पोरी, तुझ्या जीवावरच कोणी उठत असेल तर पूर्ण ताकदीने त्याला खुशाल प्रत्युत्तर दे बाकीचे तुझा बाप पाहून घेईल, अशी शिकवण देऊनच तुला ‘श्वापदांच्या’ कळपात धाडले होते.
रानावनात फिरताना रानातल्या माणसाला आणि वन्यप्राण्याला केवढा आधार दिलास तू.
होय तेच प्रशिक्षण मिळाले होते तुला. त्यांच्या परीक्षेत कुठेही कमी पडली नाहीस बाळा. म्हणूनच मोठी जबाबदारी मिळाली तुला बक्षीस नव्हे तर ‘नाईलाज’ म्हणून. कायदा बायकांच्या बाजूने असल्यामुळे नोकऱ्या बळकावत असल्याचा शेरा केव्हाच पुसून स्वतःला सिद्ध केलेस. परंतु, का मिळाले नव्हते अधिकारी नावाच्या प्राण्याशी लढायचे प्रशिक्षण तुला.. !!
वाघाच्या डरकाळीला भीक न घालणारे बळ तुझ्यात पाहून बरे वाटले होतेस. चोरट्याना पळवून पाठही थोपटून घेतलीस तू. माझीही छाती फुलली होती तेव्हा. तू असे ‘पुरुष’ होणे काळाच्या डोळ्यात खुपले होते.. की दृष्ट लागली म्हणावे.. सडलेल्या विचाराच्या डोक्यात गोळी घालून खुशाल फासावर गेली असतीस तरीही चालले असते ना..आमच्याच हृदयात पिस्तूल रिकामं केलंस बाळा..नेम चुकलास पोरी.. !!!
*****