राष्ट्रवादीने घेतला निर्णय, एप्रिलमध्ये महाविकास आघाडीत फेरबदल?

दि 23/3/2021 मोहन भारती

दिल्ली, 23 मार्च : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांच्या पत्रामुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh ) अडचणीत सापडले आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने लावून धरली आहे. परंतु, अखेर आता राष्ट्रवादीने (NCP)अनिल देशमुख यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. अनिल देशमुखांच्या खात्यात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  राज्यात लवकरच मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार आहे. एप्रिल महिन्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता आहे.. अनिल देशमुख यांच्यावर अनेक आरोप झाल्यामुळे राष्ट्रवादी अडचणीत आली आहे. विरोधकांनी अनिल देशमुख यांची मागणी लावून धरली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी परमबीर सिंग यांच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही, त्यामुळे राजीनामा घेणार नाही, असं स्पष्ट केले आहे.  पण, अखेर आता राष्ट्रवादीने गृहमंत्री अनिल देशमुख  यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एप्रिल महिन्यात खांदेपालट होणार आहे. त्यामध्ये अनिल देशमुख यांच्या गृहखात्यात बदल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) आणि गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांच्यात नवी दिल्ली इथं एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. जवळपास 2 तास चाललेल्या या बैठकीत पवार यांनी मुंबईतील घडामोडींबाबत गृहमंत्र्यांकडून सविस्तर माहिती घेतली. तसंच पोलीस यंत्रणेकडून झालेल्या कारभाराबाबत शरद पवार यांनी गृहमंत्र्यांना जाब विचारल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

सचिन वाझे प्रकरणावरून शरद पवार हे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीकडून गृहमंत्रिपदासाठी नव्या चेहऱ्याचा शोध घेतला जात आहे आणि यासाठी आता शरद पवार पुन्हा आपल्या धक्कातंत्राचा वापर करणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *