कोरपना येथे दक्षता समितीची बैठक
प्रत्येक गावात समितीचे फलक लागणार
दि 19 /3 / 2021 मोहन भारती
कोरपना – येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये गुरुवारी दक्षता समिती व तालुक्यातील रेशन दुकानदारांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये आमदार सुभाष धोटे यांनी रेशन दुकानदारांच्या समस्या समजून घेतल्या व दुकानदारांना ग्राहकांशी सामंजस्याने वागण्याच्या सूचना केल्या.
समिती स्थापन झाल्यानंतर कोरपना तालुका दक्षता समितीची ही पहिलीच बैठक होती. कोरपना तालुका दक्षता समितीचे अध्यक्ष तथा आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी तहसीलदार महेंद्र वाकलेकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजय बावणे, गडचांदूरच्या नगराध्यक्ष सविता टेकाम,दक्षता समिती चे सदस्य शेख अख्तर शेख चमन, पुरवठा निरीक्षण अधिकारी मनिषा गंभीरे, प्रा. आशिष देरकर, प्रा. उमेश राजुरकर, अभय मुनोत, शैलेश लोखंडे यांचेसह दक्षता समितीचे सदस्य सरिता पोडे, रुंद्रा सिडाम, गौतम निरंजने, अनिल मेश्राम, उषा चौधरी, देवराव सोनटक्के, वामन भिवापूरे, विलास मडावी, आशा मडावी, अर्चना वांढरे, भारती मडावी, व्दारकाबाई पिंपळकर, अरविंद मेश्राम, शारदा पांडे, साबीर कुरेशी, रत्नमाला ताडे, यासह कोरपना तालुक्यातील रास्तभाव दुकानदार उपस्थित होते.
दुकानदारांना वाटपात मिळणारे कमिशन कमी आहे, पीओसी मशीन व्यवस्थित काम करीत नाही, धान्यात तूट येते, हमाल मनमानीनुसार हमाली घेतात, कोरोना काळातील मोफत धान्य वितरणातील २ महिन्याचे कमीशन अजूनही प्राप्त झाले नाही अशा अनेक समस्या दुकानदारांनी मांडल्या. दुकानदारांच्या सर्व समस्या शासन दरबारी मांडून सोडविण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन आमदार सुभाष धोटे यांनी दुकानदारांना दिले. प्रत्येक दुकानासमोर दर पत्रक व दक्षता समितीची कार्यकारिणी फलक लागणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अन्नपुरवठा विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना धान्य वाटपात येणाऱ्या अडचणी संवेदनशीलतेने सोडवून सर्व लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ घ्यावा असे निर्देश दिले.
औद्योगिक तालुका असल्याने धान्याचा साठा व पुरवठा वाढवावा
कोरपना तालुका औद्योगिक असून चार सिमेंट कारखाने आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या याठिकाणी जास्त असल्याने अनेक नवीन रेशन कार्ड तयार होतात. कामगार लोकांचा त्यामध्ये जास्तीत जास्त समावेश असल्याने कोरपना तालुक्यांचा धान्यसाठा वाढविण्यात यावा याकरिता जिल्हाधिकार्यांकडे ठराव पाठविण्याच्या सूचना आमदार सुभाष धोटे यांनी तहसीलदार यांना केली आहे.