By : Mohan Bharti
मुंबई, 15 मार्च : सचिन वाझे (Sachin vaze arrest) अटक प्रकरणामुळे टीकेला सामोरं जावं लागल्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये (MVA Government)मोठी उलथापालथ होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) यांची भेट घेऊन मंत्रिमंडळात खांदेपालट करण्याचा निर्णय घेतला आहे. यात सर्वात पहिला फटका हा गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना बसणार आहे. अनिल देशमुख यांची पंख छाटले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात आज वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक झाली. या बैठकीत सचिन वाझे यांच्या प्रकरणावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. त्याच बरोबर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्रिमंडळ फेरबदल संदर्भातही महत्वाची चर्चा झाली.
शिवसेनेचे रिक्त झालेले वन मंत्रालय तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील गृहमंत्रिपदी नवीन मंत्र्यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे. गेले वर्षभर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खात्यावर अनेक प्रश्नं उपस्थित करण्यात आले होते. सुशात सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण ते आताचे सचिन वाझे प्रकरणापर्यंत गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख चोख कामगिरी करू शकले नाहीत, अशी भूमिका महाविकास आघाडीच्या दोन्ही जेष्ठ नेत्यांमध्ये आहे.
अनिल देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी असले तरी त्यांच्या कामगिरीवर नाराज असल्याचे बोललं जात आहे. वन मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा याआधीच मंजूर झाला असल्यामुळे त्यांच्या खात्याची जबाबदारीही शिवसनेच्या मंत्री मंडळाबाहेरील नव्या व्यक्तीवर सोपवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
तसंच काँग्रेस अंतर्गतही काही फेरबदल होण्याची शक्यता व्यक्तं करण्यात येत आहे. या संदर्भात काँग्रेसचे दिल्लीतील ज्येष्ठ नेते निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लवकरच महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार मंत्रिमंडळात फेर बदलाचे संकेत मिळत आहे.
◼️आज दुपारपर्यंत मंत्र्यांना दिली जाणार माहिती
शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला काही मंत्र्यांच्या विभागांमध्ये बदल करायचे आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, आज दुपारी संबंधित मंत्र्यांना खातेबदलाबद्दल माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे कोणत्या मंत्र्याचे पंख छाटले जाणार आणि कुणाची वर्णी लागणार हे पाहण्याचे ठरणार आहे.