विदर्भ, मराठवाडा, खान्‍देशच्‍या जनतेची थट्टा करणारा अपयशी सरकारचा अर्थहीन अर्थसंकल्‍प – आ. सुधीर मुनगंटीवार

विदर्भ, मराठवाडा, खान्‍देशच्‍या जनतेची थट्टा करणारा अपयशी महाविकास आघाडी सरकारचा अर्थहीन व दिशाहीन अर्थसंकल्‍प असल्‍याची टिका विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

अर्थमंत्री अजीत पवार यांनी विधानसभेत सादर केलेल्‍या अर्थसंकल्‍पात विदर्भ, मराठवाडा, खान्‍देश या भागासाठी केलेल्‍या विकासात्‍मक तरतूदी सुक्ष्‍मदर्शी यंत्राने बघाव्‍या लागतील अशा आहेत. गेल्‍या वर्षभरात कोरोनाच्‍या प्रकोपामुळे जे संकट राज्‍याने अनुभवले त्‍यात उद्योग, सेवा, बांधकाम क्षेत्र, वस्‍तु निर्माण क्षेत्र, वाहतुक क्षेत्र, व्‍यापार क्षेत्र या सर्वच क्षेत्रांवर कोरोनाच्‍या संकटात प्रतिकुल परिणाम झाला. अनेक घटकांना आर्थिक विवंचनेचा फटका आजही सहन करावा लागत आहे. राज्‍यावरील ही आपत्‍ती लक्षात घेता ही सारी क्षेत्रे यामधून बाहेर पडण्‍यासाठी मोठे पॅकेज अर्थमंत्री म्‍हणून अजित पवार देतील अशी अपेक्षा राज्‍यातील जनतेला होती, पण अशा पध्‍दतीचे कोणतेही दिलासात्‍मक पॅकेज अर्थमंत्र्यांनी घोषीत न करून राज्‍याची निराशा केली आहे.

गेल्‍या ६१ वर्षात प्रथमच राज्‍याचे दरडोई उत्‍पन्‍न १३३४६ रू. ने कमी झाले आहे, पण कोणतीही गरीब कल्‍याण योजना अर्थमंत्र्यांनी घोषीत केली नाही. जागतीक महिला दिनी अर्थसंकल्‍प अर्थमंत्र्यांनी जाहीर केला, महिलांसाठी भरघोस तरतूद होईल अशी अपेक्षा होती. मात्र किरकोळ घोषणा करून महिलांना सुध्‍दा या सरकारने न्‍याय दिला नाही. डोंगर खणला, उंदीर निघाला या म्‍हणीच्‍या पूढे जात डोंगर खणला आणि उंदराचे चित्र निघाले अशी अवस्‍था या अर्थसंकल्‍पाची आहे. या अर्थसंकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन शक्‍तीशाली महाराष्‍ट्राच्‍या भविष्‍याचा वेध अर्थमंत्री घेतील अशी अपेक्षा होती. मात्र कोरोना काळात निर्माण झालेले प्रश्‍न सोडविण्‍याचा प्रयत्‍न सुध्‍दा या अर्थसंकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन केला गेला नाही. महाविकास आघाडी सरकारच्‍या घटक पक्षांचे शपथनामे, वचननामे यांचे प्रतिबिंब अर्थसंकल्‍पात दिसेल अशी अपेक्षा होती. मात्र राज्‍यातील कष्‍टकरी, शेतकरी, गोरगरीब जनतेच्‍या तोंडाला अर्थमंत्र्यांनी पाने पुसल्‍याची टिका आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *